‘लोकसत्ता ठाणे’च्या वृत्तानंतर डोंबिवलीत पालिका-पोलिसांची कारवाई

पालिकेची परवानगी घेण्याआधीच नियम पायदळी तुडवून डोंबिवली पश्चिमेतील पंडित दीनदयाळ रस्त्यावर उभारण्यात आलेले दोन मंडप कल्याण-डोंबिवली महापालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने हटवले. पालिकेच्या ‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे रस्त्यावरील वाहतुकीस होत असलेला अडथळा दूर झाला आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये शनिवारच्या अंकामध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत पालिकेने ही कारवाई केली.

नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या दीनदयाळ रस्त्यावर उभारण्यात आलेल्या या मंडपामुळे वाहतुकीस होत असलेल्या अडथळय़ाबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये गेल्या शनिवारी प्रसिद्ध झाले होते. याची गंभीर दखल पालिका आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी घेतली व मंडप हटवण्याचे आदेश दिले. त्यानंतर विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुणगेकर यांनी रविवारी गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत परवानगी घ्या, मगच मंडप उभारा, असे आवाहन केले. त्यानंतर ‘ह’ प्रभागाचे प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे, विष्णुनगर पोलिसांच्या सहकार्याने दीनदयाळ रस्त्यावरील मंडप काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली.

महापालिकेने नुकत्याच उभारलेल्या नव्या कोऱ्या दीनदयाळ रस्त्यावर आनंदनगरमध्ये हे दोन भव्य मंडप उभारण्यात आले होते. उद्यानाजवळील मंडपाला पत्रे ठोकण्याचे काम सुरू करण्यात आले होते. येथील एका मंडळाला एका राजकीय पदाधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याचे समजते. दरम्यान, परिसरातील रहिवासी आणि वाहनचालकांनी या कारवाईबद्दल सर्वाधिक समाधान व्यक्त केले आहे. अशा प्रकारची कारवाई महात्मा फुले रस्ता व सुभाष रस्ता यांच्या दरम्यानच्या कोल्हापुरे चौकातील एका मंडपावर करण्यात आली आहे. या रस्त्यावरील गल्लीतील मंडप अवाढव्य स्वरूपात उभारण्यात येत होता. त्यामुळे गणेशोत्सव काळात वाहनांची सर्वाधिक कोंडी या भागात होत होती.

मंडपांचे पाहणीचे आदेश देण्यात आले होते. प्रत्यक्ष पाहणीत हे मंडप परवानगी न घेताच व प्रस्तावित चौकटीत न बसविता उभारण्यात आले होते. हे दोन्ही मंडप सोमवारी काढून टाकण्यात आले आहेत.

– अरुण वानखेडे, प्रभाग अधिकारी, ह प्रभाग, डोंबिवली