औद्योगिक कारखाने आणि रासायनिक उद्योगांमुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या ठाणे खाडी किनाऱ्यावर चौपाटी उभारणे सागरी पर्यावरणाला हितकारक नाही, अशी स्पष्ट भूमिका या भागातील पर्यावरणतज्ज्ञांनी घेतली आहे. खाडी म्हणजे समुद्र नाही, हे मुळात लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे खाडी किनाऱ्यावर अनैसर्गिक चौपाटी तयार झाल्यास त्यामुळे सागरी पर्यावरण राखले जाईल का, असा थेट सवाल पर्यावरणतज्ज्ञांनी केला आहे. खाडी किनाऱ्यावरील अतिक्रमणे हटविण्याला प्राधान्यक्रम असायलाच हवा. मुळात अशी अतिक्रमणे उभीच राहता कामा नयेत. मात्र, खाडीकिनारी चौपाटी हा पर्याय होऊ शकत नाही, अशी ठोस भूमिका खाडी किनाऱ्यांचा बारकाईने अभ्यास करणाऱ्या पर्यावरणतज्ज्ञांनी घेतली आहे.
खाडीच्या रक्षणासाठी गेली अनेक वर्षे ‘स्वच्छ खाडी’ उपक्रम राबवणाऱ्या पर्यावरण दक्षता मंचाने याविषयी जनजागृती करत खाडीवर उपजीविका असणाऱ्या समाजाचे संघटन करून त्यांची नेमकी परिस्थिती दाखवणारा सद्य:स्थिती अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे. खाडी किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात खारफुटीची जंगले आणि दलदलीचा भाग आहे. सुमारे २६ किमी लांबीच्या ठाणे खाडी किनाऱ्यावर १०० ते ५०० मीटर रुंद असा दोन्ही बाजूंचा भाग खारफुटी आणि दलदलीने व्याप्त आहे. या भागातील सुशोभीकरण करण्याचा निर्णय म्हणजे या खारफुटीला धोका निर्माण होत असून तेथील दलदलही नष्ट होऊन जाण्याची शक्यता आहे. सुशोभीकरणाच्या निमित्ताने केले जाणारे बांधकाम म्हणजे खाडी किनाऱ्यावर सिमेंट काँक्रीटचे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खाडीच्या जैवविविधतेला धोका निर्माण होऊन पर्यावरणाची मोठी हानी होण्याची शक्यता आहे, असा सूर ‘पर्यावरण दक्षता मंचाच्या’ पर्यावरण तज्ज्ञांनी लावला आहे.

खाडीकिनारी चौपाटी उभारल्यास तेथील खारफुटी मोठय़ा प्रमाणात नष्ट होऊ शकते. त्यामुळे चौपाटी उभारण्याऐवजी तेथील जैवविविधतेचे रक्षण करून त्याचे नागरिकांना दर्शन घडवणाऱ्या छोटय़ा जंगलांची किंवा पार्कची निर्मिती करणे गरजेचे आहे.
 – प्रा. विद्याधर वालावकर, पर्यावरण दक्षता मंच