कराकरा वाजत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा रुबाब वाढविणाऱ्या कोल्हापुरी चपलेचा बाजार तसा कधीच मंदावला नव्हताच. पण गावच्या मातीशी जुळल्या गेलेल्यांच्या पायात झळकणारी कोल्हापुरी चप्पल आता तरुणाईलाही आकर्षित करू लागली आहे. सण समारंभात पारंपरिक वेशभूषेचा नवा ट्रेण्ड गेल्या काही वर्षांपासून जोर धरत आहे. लग्न कार्यात एरवी शेरवानी आणि सुटाबुटाच्या प्रेमात पडणारी तरुणाई हल्ली सोवळा आणि नक्षीदार कुर्त्यांच्या पेहरावातही दिसू लागली आहे. अशा वातावरणात कोल्हापुरी चपलेची मागणी कमी होईल ही भीती व्यक्त करायला जागाच उरत नाही. उष्णतेपासून बचाव करणारी, जाडजूड असूनही बारीक नक्षीकामाचे वेगळेपण मिरवणारी ‘कोल्हापुरी चप्पल’ एरवीही अनेकांच्या व्यक्तिमत्त्वाची शान वाढवत असते. जगाच्या बाजारात दर्जेदार चप्पलनिर्मिती क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व आणि दर्जा आजही कोल्हापूरी चपलेने टिकवून ठेवला आहे. चप्पल निर्मिती क्षेत्रात कसबी कारागीर अपवादानेच घडतात अशी या क्षेत्राची जुनी तक्रार आहे. असे असताना जुन्या जाणत्या कारागिरांच्या बोटातील कसबेवर कोल्हापुरी चप्पलची शान आजही टिकून आहे. हायहिल्स आणि फ्लॅट शूजच्या युगातही कोल्हापुरी चप्पल आपले वेगळेपण टिकवून आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी दादर आणि आसपासच्या भागापुरता बाजार राखून असणारी ही चप्पलेने आता ठाण्यातही स्वतची बाजारपेठ निर्माण केली आहे.
केवळ पावलांचे सरंक्षण व्हावे या उद्देशाने सुरू झालेल्या पादत्राणांच्या वापर काळानुरूप बदलत गेला. पादत्राणे म्हणजे सुलभता, आराम आणि स्टाइल हे हल्लीच्या युगातील समीकरण बनले आहे. फॅशनच्या जगात अ‍ॅक्सेसरीजना म्हणजेच पेहरावात समाविष्ट असणाऱ्या विविध प्रकारांना पोशाखाइतकेच महत्त्व आले आहे. पेहरावातील वेगळेपण दर्शवायचे असेल तर पादत्राणांना वगळून कसे चालेल हा समज उशिरा का होईना आता आपल्याकडेही दृढ होऊ लागला आहे. त्यामुळेच पादत्राणांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. पादत्राणांमुळे एखाद्या फॅशनेबल व्यक्तीची वेगळी ओळख निर्माण होऊ लागते. त्याचबरोबर एखाद्याची विशेष रुची, त्याची आरामाची संकल्पना याचे प्रतिबिंबदेखील त्यातून उमटते. फॅशन अ‍ॅक्सेसरीजचाच एक भाग बनलेल्या पादत्राणांचे वेगवेगळे ट्रेण्ड्स्सध्या बाजारात पाहायला मिळत असले तरी पारंपरिक पादत्राणांमध्ये कोल्हापुरीला आजही मानाचे स्थान आहे. महत्त्वाचे म्हणजे या कोल्हापुरी चप्पलेने गेल्या काही वर्षांपासून मोजडीतही स्वतला सामावून घेतले आहे. त्यामुळे चप्पल आणि मोजडी वेगळी वाटेनाशी झाली आहे.
या चप्पलांना १३ व्या शतकापासूनचा इतिहास आहे. ठाण्यातील बाजारामध्ये अनेक प्रकारचे स्टायलिश पादत्राणे उपलब्ध आहेत. आजही अनेकांच्या आवडीच्या यादीत कोल्हापुरी चपलांचा समावेश आहे. काळानुरूप त्यांच्यात थोडाफार बदल करण्यात आला आहे. त्यामुळे त्या अजुनच आकर्षक आणि सुंदर दिसू लागल्या आहेत. निरनिराळ्या आकारात आणि फॅशनच्या स्वरूपात उपलब्ध झाल्याने कोल्हापुरी चपलने जगाच्या बाजारपेठेत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. जगात दर तासाला फॅशन बदलत असतानाही गेली कित्येक वर्षे कोल्हापुरी चपलांनी मात्र फॅशन जगतावर एकहाती सत्ता गाजवली आहे. त्यामुळे आजही कोल्हापुरी चपलेचे वेड कणभरही कमी झालेले नाही. पुरुषांप्रमाणेच महिला वर्गालाही या चप्पल प्रकारने भुरळ घातली असून आता कोल्हापुरी चप्पल उत्पादकही आपली परंपरा थोडी बाजूला ठेवून बाजारात हातोहात खपतील, अशा प्रकारच्या डिझाइन्स बाजारत आणू लागले आहेत.

कोल्हापुरी पादत्राणांची काही ठळक वैशिष्टय़े..
’ चर्म- या चपला पूर्णपणे चामडय़ापासून बनलेल्या असतात. यामुळे त्यांना वेगळे रूप येते, त्यामुळे त्या अधिक टिकतात. पूर्वी या चपला केवळ मृत म्हशीच्या चामडीपासून बनवली जायची. पण आता त्यांना अजून आरामदायक करण्यासाठी मऊ चर्माचाही वापर केलेला पाहायला मिळतो.
’ नक्षीमधील बदल- या चपलांना कारागिरांनी नवीन नक्षी आणि आकार देऊन अधिक देखणे रूप प्रदान केले आहे. त्यांना अधिक आकर्षक रूप देण्यासाठी त्यांची रुंदी कमी करण्यात आली आहे. नव्या कोल्हापुरीला सर्व प्रकारच्या पेहरावावर परिधान केले जाते. या चपला महाविद्यालयीन तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय बनल्या आहेत.
’ अष्टपैलूपणा- कोल्हापुरी चपलांवर आपल्याला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या चपला पारंपरिक तसेच इतर पाश्चिमात्य पेहरावांवरही छान दिसतात. उदा. : जीन्स-कुर्ता, सलवार, साडी इत्यादी.
’ अभिनेत्यांची आवडती कोल्हापुरी चप्पल- कित्येक कार्यक्रमांमध्ये अनेक कलाकार आवर्जून ही चप्पल घालताना दिसून येते. त्यात विराट कोहली, दीपिका पादुकोन आणि इतरही अनेक अभिनेत्यांचा समावेश आहे. कोणत्याही कपडय़ांवर या चपला उठून दिसतात.
’ इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या चपलांची खास आवड आहे.

Ram Navami 2024 Shubh Yog
२०२४ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग जुळून आल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

कुठे आणि किंमत..
ठाण्यातील जांभळीनाका बाजारपेठ, गावदेवी परिसरातील पादत्राणांची दुकाने, विवियाना मॉल, कोरम मॉलबरोबरच अनेक चर्मकारांच्या दुकानांमध्ये कोल्हापुरी चपला तयार होतात. ही पादत्राणे २०० रुपयांपासून उपलब्ध आहेत.

रंगीबेरंगी कोल्हापुरी
सुबक आकार, चॉकलेटी किंवा फिकट चॉकलेटी रंग, लाल गोंडा, थोडेफार नक्षीकाम आणि अस्सल कातडय़ाची ही पादत्राणे केवळ भारतातच नव्हे तर जगातही लोकप्रिय आहेत. केवळ भारतातील मोठी शहरेच नव्हेत तर थायलंड, इंग्लंडसारख्या देशांतही या चपला विक्रीसाठी निर्यात केल्या जातात. इतिहासप्रसिद्ध या पादत्राणांनी आता मात्र आपले रूप थोडे बदलले आहे. महिला वर्गाला मॅचिंगची असलेली चटक लक्षात घेता पारंपरिक रंगाबरोबरच विविध रंगांत म्हणजे हिरवा, लाल, जांभळा, गुलाबी, सोनेरी, चंदेरी अशा विविध रंगांत या चपला उपलब्ध आहेत. त्यावर पारंपरिक कारागिरीबरोबरच आता भरतकाम, मणीकामही केले जात आहे. महिलांना या चपलांची मोहिनी जबरदस्त आहे आणि केवळ भारतीयच नव्हे तर पाश्चात्त्य पोशाखावरही या चपला मस्त शोभतात, असे फॅशनतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते या चपलांचा ट्रेण्ड कधीच जुना होणार नाही. शिवाय या किमतीला सहज परवडण्याजोग्या असल्याने एकच महागडी चप्पल घेण्यापेक्षा त्याच किमतीत पाच-सहा जोड सहज येतात. हिवाळा, उन्हाळ्यात वापरायला अत्यंत योग्य असल्याने त्या घेतल्यासारख्या भरपूर वापरल्याही जातात.