पोटात थंड काही तरी ढकलायचे ही उन्हाळ्यातील सर्वात पहिली गरज. पण गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात. फक्त थंडच का, थोडं चवदार, मजेदार आणि पुन्हा पुन्हा खावं असं वाटणारं काही तरी जिभेवरून घरंगळत उदरात गेलं, की खवय्येगिरीचा नवा अनुभव गाठीशी येतो. सध्या थंडाव्यासाठी tv04आईस्क्रीमसारखा परिपूर्ण पर्याय मखमली क्रीम, फळांचे ताजे रस घेऊन जागोजागी उभा आहे. अंबरनाथमध्येही अशीच एक जागा आहे, कुणाल आईस्क्रीम. गेली २० वर्षे पूर्वेला असलेले हे आईस्क्रीम पार्लर चवीने खाणाऱ्यांच्या जिभेचे चोचले पुरवत आहे. त्याविषयी..
‘कु णाल आईस्क्रीम’मध्ये १८ ‘फ्लेवर्स’ने काठोकाठ आईस्क्रीम, मिल्कशेक, तीन प्रकारचे कुल्फी फालुदा आणि खास वेज ग्रील्ड सँण्डवीच आहेत.
कुणाल आईस्क्रीम सुरुवातीला दिनशॉ आईस्क्रीममुळे नावारूपाला आले. येथे दिनशॉचे ब्लॅक करंट, स्ट्रॉबेरी, पिस्ता, राजावाडी कुल्फी, मेलोजेलो, फ्रुट ओव्हर लोड, पाइनॅपल, अंजीर, बटरस्कॉच, मँगो, चॉकलेट आईस्क्रीम मिळते; परंतु कुणाल स्पेशल मिल्कशेक आणि फालुदा हे आजचे येथील मुख्य आकर्षण आहे. रोझ, चॉकलेट, केशर, पिस्ता, स्ट्रॉबेरी, मँगो आणि बटरस्कॉच असे मिळून दहा प्रकारचे मिल्कशेक मिळतात. ताज्या दुधाच्या या मिल्कशेकमध्ये फळांची सत्त्वे वापरून त्यात आईस्क्रीमचा थंडगार मोठा गोळा टाकण्यात येतो. या थंडगार गोळ्यासाठीच येथे अनेक जण मिल्कशेकसाठी आग्रही असतात. तर, येथे मिळणारा ‘कुणाल स्पेशल कुल्फी फालुदा’ हा तीन प्रकारात मिळतो. यात डिलक्स, क्लासिक आणि जम्बो असे तीन प्रकार आहेत. शेव, रबडी, कुल्फी, काजू, किसमिस, जेली आणि चॉकलेट सॉस आणि सब्जा टाकून फालुदा तयार केला जातो. यात डिलक्स असल्यास आईस्क्रीमचे दोन गोळे, क्लासिकला तीन गोळे व जम्बोची ऑर्डर असल्यास तब्बल पाच आईस्क्रीमचे गोळे वरील मिश्रणात टाकून स्पेशल फालुदा देण्यात येतो, अशी माहिती संचालक कुणाल कर्णिक यांनी दिली.
पार्लरची प्रसिद्धी वाढत गेल्यानंतर खवय्यांच्या मागणीवरून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ येथे ठेवण्यात आले आहेत. यात सकाळी पोहे, उपमा, साबुदाणा खिचडी, शिरा, मिसळ असा मराठमोळा नाष्टा मिळतो. मात्र, संध्याकाळी पिझ्झा, बर्गर, कुणाल स्पेशल वेज ग्रिल्ड सँण्डवीच आणि पावभाजी; तसेच तवा पुलाव मिळतो. यातील ग्रिल्ड सँण्डवीच हे गरम असल्याने पातळ झालेले चीज आणि ‘स्मॅश’ बटाटय़ासोबत मिळते. त्यामुळे सँण्डवीचमधून खाताना हमखास बाहेर डोकावणारा बटाटा गपगुमान पोटात जातो. ग्रील्ड झालेल्या टॉमेटो आणि काकडीच्या बारीक गरम चकत्यादेखील सँण्डवीचमधून आपली जागा सोडत नाहीत, हे कुणालच्या सँण्डवीचचे महत्त्वाचे वैशिष्टय़.
आवड म्हणून व्यवसाय
१९९२ मध्ये राजन कर्णिक यांनी अंबरनाथ पूर्वेला खेर विभागात आपला व्यवसाय सुरू केला, परंतु नाशिकला बहिणीच्या इमारतीत आईसक्रीम पार्लर सुरू झालेले त्यांनी पाहिले आणि तसेच आईस्क्रीम पार्लर सुरू करण्याचा निर्धार पक्का केला. आज त्यांचा मुलगा कुणाल व्यवसाय चालवतो. प्रतिसाद वाढत गेल्याने नवनवीन प्रकार वाढवले. सुरुवातीला १५ रुपयांना मिळणारे आईस्क्रीम आता ४० रुपयांना मिळते; परंतु तरीही खवय्यांचा प्रतिसाद काही थांबलेला नाही, असे कर्णिक म्हणाले. झी मराठी वाहिनीवरील जावई विकत घेणे या मालिकेतील मुख्य कलाकार ‘राया’ येथे आईस्क्रीम खायला नेहमी येत असतो, असे त्यांनी आवर्जून सांगितले.