एकाच प्लॅटफॉर्मवर प्रसाधनगृह; महिला प्रवाशांचे हाल

वसई रोड रेल्वे स्थानकावर सकाळ-संध्याकाळ प्रवाशांची गर्दी असते. मात्र तरीही या स्थानकाकडे पश्चिम रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. या स्थानकावर सात प्लॅटफॉर्म आहेत, मात्र त्यांपैकी केवळ सात क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवरच प्रसाधनगृहाची सोय आहे. अन्य प्लॅटफॉर्मवर प्रसाधनांची सोय नसल्याने प्रवाशांचे खूपच हाल होत आहे. महिला प्रवाशांसाठी कोणतीही सोय नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुंबई उपनगरीय लोहमार्गावरील वसई रोड हे महत्त्वाचे स्थानक आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ा या स्थानकातून सुटतात. स्थानक परिसरात आणि आजूबाजूच्या वस्तीतील लोकसंख्या वेगाने वाढत आहे. मुंबईतील अनेक कुटुंब वसईमध्ये स्थायिक झालेली आहेत. त्यामुळे या स्थानकावरील गर्दी वाढत चालली आहे. मात्र एकीकडे प्रवाशांची गर्दी वाढत असताना त्याप्रमाणा या स्थानकावर प्रसाधनगृहांची नीट व्यवस्था नाही. या स्थानकात फलाट क्रमांक ७ वगळता कोणत्याही फलाटावर प्रसाधनगृहांची व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. लघुशंकेसाठीही जागा नसल्याने प्रवासी स्थानकाच्या आडबाजूचा वापर करतात. त्यामुळे परिसर अस्वच्छ होऊन दरुगधी पसरते आणि त्याचा त्रास प्रवाशांनाच होत आहे.

महिला प्रवाशांसाठी मात्र कोणतीही सोय नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. या समस्येकडे पश्चिम रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी विविध प्रवासी संघटना, राजकीय पक्ष आणि महिला संघटनांनी अनेकदा प्रसाधनगृहांची मागणी केली. मात्र रेल्वे प्रशासन केवळ आश्वासने देत असल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

प्रवाशांचा संताप

वसई रोड स्थानकात एटीएम यंत्रणा आहे. एटीएम यंत्रणा ही काळाची गरज आहे. पण प्रसाधनगृहे हीही काळाचीच गरज आहे. सध्या देशभर ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवले जात असताना रेल्वे प्रशासन झोपले आहे का, असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे.

वसई रोड रेल्वे स्थानकात फक्त प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर प्रसाधनगृह असल्याने वृद्धांना प्रत्येक वेळी जिने चढून तेथे जाणे शक्य होत नाही, तसेच या ठिकाणी हे एकच प्रसाधनगृह असल्याने त्या ठिकाणी दरुगधीचे साम्राज्य पसरले आहे. रात्रीच्या वेळी तर प्लॅटफॉर्म क्रमांक सातवर जाण्यास धोकादायक वाटत असल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक एक किंवा दोनवर प्रसाधनगृहे उभारावीत, अशी मागणी आहे.

– कोमल जेठे, महिला प्रवासी