ठाण्याच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेची प्रसूती झाली आहे. आई आणि बाळ दोन्ही सुरक्षित असून त्यांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. प्रवास करत असताना प्रसूती वेदना सुरु झाल्याने २५ वर्षांच्या जान्हवी ठाणे स्थानकात उतरल्या. रेल्वे स्थानकात रेल्वे पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल आणि स्थानकावरील इतर महिलांच्या मदतीने जान्हवी यांची प्रसूती करण्यात आली.

२५ वर्षांच्या जान्हवी बदलापूरहून प्रसूतीसाठी पती आणि पित्यासह घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात जात होत्या. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांना प्रसूती कळा सुरु झाल्या. यानंतर ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १० वर रेल्वे पोलीस हेड कॉन्स्टेबल शोभा मोटे आणि इतर प्रवासी महिलांच्या मदतीने जान्हवी यांची प्रसूती झाली. यानंतर त्यांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बदलापूरातील सनीनगर परिसरात राहणाऱ्या जान्हवी जाधव त्यांच्या पती आणि पत्नीसह घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात प्रसूतीसाठी जात होत्या. मात्र प्रवासादरम्यानच त्यांना प्रसूती कळा सुरु झाल्याने त्या ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर उतरल्या. यानंतर त्या प्लॅटफॉर्मवरील पुलाने प्लॅटफॉर्मवर क्रमांक १० वर आल्या. तिथून त्या कारने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात जाणार होत्या. मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक १० वरच त्यांना प्रसूती वेदना सुरु झाल्या. प्रसूती वेदनांमुळे जान्हवी यांचा जीव कासावीस झाला होता. त्यांना त्या स्थितीत पाहून रेल्वे पोलीस हेड कॉन्स्टेबल शोभा मोटे त्यांच्या मदतीला आल्या. मोटे यांनी प्लॅटफॉर्मवरील महिल्यांच्या मदतीने जान्हवीची प्रसूती केली. जान्हवी यांचे हे दुसरे अपत्य असून त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे.