खारफुटींचे जंगल नष्ट करण्याचा सपाटा
ठाणे खाडीकिनाऱ्यालगतच्या खारफुटींची कत्तल करून त्यावर चाळी आणि इमारतींचे बांधकाम करणाऱ्या भूमाफियांची मजल आता बंगले बांधण्यापर्यंत पोहोचली आहे. खाडीमध्ये भराव टाकून मोठय़ा प्रमाणात चाळींची निर्मिती करण्यासाठी कुविख्यात असलेल्या दिवा परिसरामध्ये रेल्वे रुळांच्या आजूबाजूला चाळींचे आणि बंगल्यांचे बांधकाम सुरू आहे. अवघ्या काही महिन्यांमध्येच ही बांधकामे पूर्णत्वास येऊ लागली आहेत.
खाडीमध्ये रेती उपसा करणारे रेतीमाफिया आणि खाडीकिनाऱ्यावरील खारफुटींची कत्तल करून इमारती उभारणाऱ्या भूमाफियांची दिवा परिसरात मोठी दहशत निर्माण होऊ लागली आहे. याबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने स्थानिकांत नाराजी आहे. दिवा पश्चिमेकडे खाडीचा विस्तृत प्रवाह असून त्याच्या आजूबाजूला मोठय़ा प्रमाणात खारफुटीचे जंगल आहे. हे जंगल वाळूमाफियांनी नष्ट केले आहे. त्या जागेवर भराव टाकून आता बंगल्यांची उभारणी केली जात आहे. दोन-तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. खारफुटींवर भराव टाकून अवघ्या महिनाभरात इमारत उभी केली जात आहे. त्यातच ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांची बदली होताच या कामाला आणखी वेग आला आहे.

दिवा परिसरातील खारफुटीवर भरणी घालण्याचे प्रकार दिसल्यास महापालिका प्रशासनाच्या वतीने तहसीलदारांकडे पत्र पाठवून या विषयाची माहिती दिली जाते. त्यानुसार दिव्यात सुरू असलेल्या प्रकाराची माहिती यापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. या भागामध्ये उभ्या राहणाऱ्या चाळींवर महापालिकेच्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्ताअभावी शनिवारी कारवाई होऊ शकली नाही. मात्र, गुरुवारी ही कारवाई करण्यात येईल.
– दयानंद गोरे, साहाय्यक आयुक्त, दिवा-मुंब्रा अतिक्रमण विभाग

श्रीकांत सावंत,