ठाणे-मुंब्रा बायपास मार्गावर सोमवारी मध्यरात्री दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे सध्या ठाणे-मुंब्रा बायपास मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंब्य्रातील रेहमानिया रूग्णालयानजीक ही दुर्घटना घडली. यावेळी डोंगराचा काही भाग खाली कोसळून मोठ्याप्रमाणावर माती आणि दगड रस्त्यावर आले. त्यामुळे सध्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ही दरड कोसळल्याची शक्यता आहे. दरम्यान, दुर्घटनेची माहिती समजल्यानंतर स्थानिक मदत यंत्रणा याठिकाणी दाखल झाल्या असून सध्या बुलडोझरच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही तासांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वे विस्कळीत

मुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गाची वाहतूकही मंगळवारी सकाळी विस्कळीत झाली आहे. गोरेगाव स्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे पश्चिम रेल्वेच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या मार्गावरील ट्रेन्स १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेत प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.