कल्याण येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आगाराला ‘एलबीटी’ आणि ‘टोल’मुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. परिणामी उत्पन्नापेक्षा खर्च वाढल्याने आगार आर्थिक संकटात असल्याचे चित्र आहे. त्यात स्थानिक महापालिका परिवहन सेवा आणि खासगी वाहतूकदारांमुळे एस.टी वाहतुकीपुढे अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागातील सामान्य प्रवाशांचे हक्काचे आणि उपयुक्त असे वाहतुकीचे साधन म्हणजे एसटी. मात्र सध्या या एसटीचीच अवस्था बिकट होत चालली आहे. एसटीला विविध मार्गावर द्यावा लागणारा टोल, एलबीटीमुळे न परवडणारा इंधन खर्च आणि प्रवासी कर यामुळे महामंडळापुढे मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. राज्य सरकार महामंडळाकडून सुमारे १७.५ टक्के प्रवासी कर घेते. हा कर शेजारील इतर राज्यांमध्ये सहा टक्केच आहे. तसेच इतर राज्यातील महामंडळांना त्यांच्या राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. आघाडी सरकारच्या काळात एसटीला टोलमधून माफी, प्रवासी करात पाच टक्के सुट आणि गाडय़ा खरेदीसाठी पाच टक्के निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अद्याप याची अंमलबजावणी झाली नसल्याचे एस.टी.चा प्रवास रखडत रखडतच सुरू आहे.  
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त  
कल्याण आगाराचे महिन्याचे उत्पन्न एक कोटी ९७ लाख रुपये आहे. तर खर्च दोन कोटी ९ लाख रुपये आहे. हंगामात सुमारे साडेआठ लाख रुपये दिवसाला उत्पन्न मिळते. तर इतर वेळी हेच उत्पन्न सुमारे साडेपाच लाख रुपये असते. तर विविध मार्गावरील टोलचा एकूण खर्च महिन्याला पाच लाख ९५ हजार रुपये होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पालिका परिवहन सेवा, खासगी वाहनांशी स्पर्धा कल्याण-डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा आणि एसटीच्या अनेक मार्गावरून धावणाऱ्या खासगी वाहनांमुळे एसटीची आर्थिक कोंडी होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी चालक, वाहकांना योग्य प्रशिक्षण, प्रवाशांशी सौजन्याने वागण्यासाठी प्रबोधन करण्यात येते. तसेच बसगाडय़ांची योग्य देखभाल घेण्यात येत असल्याचे कल्याण आगाराचे प्रभारी व्यवस्थापक एस. एन. रुपवते यांनी सांगितले. त्याचबरोबर शाळांच्या सहलीसाठी ५० टक्के सवलतीत बस गाडय़ा देण्यात येतात. त्यासाठी शाळांशी वेळोवेळी संपर्कही साधण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.     
 कोंडीचे एसटीवर खापर
शहरातील स्थानक परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीला नेहमीच एसटीला जबाबदार धरण्यात येते. वास्तविक पाहता वाहतूक पोलिसांच्या सूचनांनुसार परिवहन बससेवेचा मार्ग आखण्यात आला आहे. खासगी वाहन आणि वाहन तळ सोडून उभ्या राहणाऱ्या रिक्षांमुळे वाहतूक कोंडी होते. मात्र याचे खापर एसटीवरच फोडण्यात येते. या वाहतूक कोंडीमुळे खासगी वाहनांचे फावते. कारण सततच्या कोंडीमुळे ज्या थांब्यावर बसला पोहचण्यासाठी २० मिनिटे लागतात. तिथे पोहचण्यासाठी बसला ४५ मिनिटे, तर कधी एक तासही लागतो. परिणामी प्रवाशांमध्ये घट होत आहे.

पंप आहे; इंधन नाही!
साधारणत: प्रत्येक आगाराच्या ठिकाणी इंधनाची सोय असते. तशी कल्याणमध्येही आहे. परंतु २०१३पासून हा पंप बंद आहे. याला ‘एलबीटी कर’ कारणीभूत आहे. येथील बसगाडय़ांना दिवसाला सुमारे साडेपाच हजार लिटर डिझेल लागते. त्याला सुमारे तीन लाख रुपये खर्च येतो. एलबीटीमुळे डिझेल दरामध्ये सुमारे ८-९ रुपयांचा फरक पडतो. परिणामी येथील पंप बंद पडला आहे. त्यामुळे या आगारातील बसगाडय़ांना पनवेल आणि मुरबाड येथून इंधन भरावे लागते. विहीर असून पाणी नाही, अशी काहीशी स्थिती येथे निर्माण झाली आहे.

* २० मार्च १९७२ मध्ये आगाराची महामंडळ सदस्य कृष्णराव धुळप यांच्या हस्ते स्थापना.
* बसगाडय़ांच्या देखभालीसाठी कार्यशाळेत ४५० कर्मचारी
* विविध मार्गावरील एकूण एक हजार १९८ बसगाडय़ांच्या फेऱ्या
* यात कल्याणच्या दिवसाला ४९८ आणि इतर विभागातून येणाऱ्या एकूण ७०० बसफेऱ्यांचा समावेश.
* येथून सुटणाऱ्या बसच्या कमीत कमी भाडे ९ रुपये तर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडला जाणाऱ्या बसचे भाडे म्हणजेच सर्वात लांबचे भाडे ६३६ रुपये आहे.