डोंबिवलीच्या नयनचा थरारक प्रवास; बिबटय़ाच्या छायाचित्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

आदिवासी पाडय़ात दोन घरांच्या मधून जाणारा बिबटय़ा कॅमेऱ्यात टिपणे ही संयमाची परीक्षा पाहणारी गोष्ट होती. बिबटय़ाचा मार्ग समजल्यानंतर त्याची पाहणी केली. परिपूर्ण माहिती घेऊन, छोटय़ा ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये त्याचे छायाचित्र टिपले. त्यानंतर छायाचित्रणासाठी आवश्यक कॅमेरा, प्रकाशयोजना याची सोय केली. त्यानंतर मनाजोगता फोटो मिळेपर्यंत प्रयत्न सुरू ठेवले. चार महिन्यानंतर कॅमेऱ्याच्या दिशेने पहात असलेला बिबटय़ा छायाचित्रित करण्यात यश आले, डोंबिवलीचे नयन खानविलकर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात टिपलेल्या बिबटय़ाच्या छायाचित्रापर्यंतचा प्रवास विशद करीत होते.

त्यांच्या या मेहनतीची दखल बीबीसी आणि ‘द नॅचरल हिस्ट्री म्युझियम’ लंडनने घेतली आहे. लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या एका विशेष कार्यक्रमात त्यांना वन्यजीव छायाचित्रण क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मानवी वस्तीतील वन्यप्राण्यांचा वावर दाखवणाऱ्या या छायाचित्राने ९० देशांतील ५० हजार छायाचित्रांमधून पहिल्या १० चित्रांमध्ये स्थान मिळवले आहे. मुंबईतील आरे कॉलनी परिसरातील आदिवासी पाडय़ात गेल्या वर्षी हे छायाचित्र टिपण्यात आले होते.

डोंबिवली येथे राहणारे नयन खानविलकर यांची वयाच्या बाराव्या वर्षी वन्यप्राणी जगताशी ओळख झाली. जिम कॉर्बेट यांचे ‘द मॅन इटर्स ऑफ कुमाऊं’ हे पुस्तक वाचून त्यांची वन्यप्राण्यांच्या क्षेत्राशी जवळीक वाढली. त्यानंतर त्यांनी जीवशास्त्र आणि वनस्पतिशास्त्राचा अभ्यास केला. मुंबईतील सेंट झेविअर्स महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीमध्ये (बीएनएचएस) संशोधक पदावर ते कार्यरत होते. त्यांची या विषयातील गती लक्षात घेऊन त्यांची नियुक्ती केवलादेव राष्ट्रीय उद्यान, भारतपूर येथे करण्यात आली. त्या वेळी त्यांची व्यावसायिक छायाचित्रकारांशी ओळख झाली. त्यांचे काम पाहण्याची संधी त्यांना मिळाली. सतत नवे प्रयोग त्यातून होणाऱ्या चुका आणि त्रुटींच्या अनुभवातून नयन यांचा छायाचित्रणाचा अभ्यास सुरू होता.

संपूर्ण देशातील वेगवेगळ्या अधिवासांचा अभ्यास त्यांनी केला. लडाख, लक्षद्वीप, राजस्थान तसेच आसामच्या जंगलामध्ये त्यांने छायाचित्रण केले. त्यानंतर शहरी भागांतील बिबटय़ांविषयी माहिती गोळा करण्याचे काम त्यांना मिळाले. त्यानंतर प्रत्येक बिबटय़ाचे फोटो काढण्याचा ध्यास त्यांनी घेतला, असे त्यांचे सहकारी सांगतात.

पुरस्काराविषयी..

बीबीसी वाइल्ड लाइफ मासिकाच्या वतीने १९६५ साली वन्य छायाचित्रकारांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हापासून गेली ५१ वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा होते. १९८४ साली या स्पर्धेशी ‘द नॅचरल हिस्ट्री म्युझियम’ जोडले गेले. या स्पर्धेचे आज दिसत असत असलेले स्वरूप तेव्हापासून कायम आहे. सध्या ‘द नॅचरल हिस्ट्री म्युझियम’ लंडनच्या वतीने ही स्पर्धा घेतली जाते. वन्यजीव छायाचित्रण क्षेत्रातील ही सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा आहे.