विक्रेते आणि पालिकेच्या समन्वयाअभावी ग्राहकांना त्रास

बदलापुरातील मासळी बाजारात गेल्या काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मासळी बाजारातील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने दरुगधी वाढली असून याबाबत पालिका प्रशासन याची दखल घेत नसल्याने विक्रेत्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचा विक्रेत्यांचा आरोप आहे. मात्र हे दररोजचे काम असून ते विक्रेत्यांनीच करावयाचे आहे, असे पालिकेचे मत आहे. मात्र यात ग्राहकांना नाक दाबून खरेदी करावी लागत आहे.

बदलापूर पूर्व भागात रेल्वे स्टेशनलगत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने राष्ट्रीय मात्स्यिकी महामंडळाच्या निधीतून मासळी बाजाराची एक मजली इमारत बांधली आहे. या इमारतीसमोरील मोकळ्या जागेत काही विक्रेते टपरीवजा दुकानात मासळी तसेच चिकन व मटण विक्रीचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून करत होते. या विक्रेत्यांना नगर परिषदेने या मासळी बाजाराच्या इमारतीत गाळे उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे उड्डाणपुलाखाली मासळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांनाही या इमारतीत गाळे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या मासळी बाजाराच्या इमारतीत विक्रेत्यांना वीज, पाणी, शीतगृह, शौचालय अशा आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील, असे आश्वासन नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र काही दिवसातच नगर पालिका प्रशासनाला या आश्वासनाचा विसर पडला, असा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. मासळी बाजारात मांस व मासळी विक्री होत असल्याने त्याचे पाणी साचून राहिल्यास प्रचंड दरुगधी पसरते. त्यामुळे येथील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थितपणे व्हावा याची काळजी नगरपालिका प्रशासनाने घेणे आवश्यक होते. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने येथे दरुगधी पसरली आहे. याबाबत पालिका प्रशासनाला तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप मासळी बाजारातील विक्रेते दिलीप पवार यांनी केला आहे. दरुगधीमुळे विक्रेत्यांना आणि ग्राहकांना तसेच परिसरातील नागरिकांनाही त्रास होत आहे. पाणी साचल्याने काही विक्रेते आणि ग्राहक घसरून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज विक्रेते व्यक्त करत आहेत.

मात्र पालिकेच्या करारानुसार मासे विक्रेत्यांनी संस्था स्थापन करून स्वत:च या बाजाराची स्वच्छता पाहायची आहे. त्यामुळे विक्रेत्यांचेच नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत मुख्याधिकारी देवीदास पवार यांनी व्यक्त केले आहे. तसेच अनेक विक्रेत्यांनी भाडेकरारही केले नाहीत, त्यामुळे विक्रेत्यांनी कायदेशीर बाबीही पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

पालिकेने पाणी, वीज आणि औषध फवारणीसारख्या प्राथमिक सुविधाही दिल्या नसल्याने आम्ही भाडेकरार केला नाही. बाजार इमारतीला दोन प्रवेशद्वारे होती. त्यातील एक बंद केल्याने त्याचा व्यवसायावर परिणाम होतो आहे. त्यामुळे प्राथमिक सुविधा द्याव्या मग भाडेकरार करावा.

– दिलीप पवार, मासे विक्रेते