थकबाकीदारांच्या घरासमोर बॅण्डबाजा वाजणार; मीरा-भाईंदर महापालिकेची योजना

आपल्या घरासमोर अथवा परिसरात यापुढे वाद्य वाजत असेल तर ती एखाद्या लग्नाची अथवा कार्यक्रमाची मिरवणूक आहे, असे गृहीत धरू नका. दारासमोर कदाचित मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेचे कर्मचारी आले असण्याची शक्यता आहे. मालमत्ता कराची भरणा न केलेल्या थकबाकीदारांच्या घरासमोर बॅण्डबाजा वाजविण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महापालिकेने घेतला आहे. आर्थिक वर्ष संपत आले असून यंदा मालमत्ता कराची वसुली समाधानकारक न झाल्याने करवसुलासाठी प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात येणार आहे.

मालमत्ता कर हा माहापालिकेच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्रोत आहे. यंदा या कराची १९० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट नक्की करण्यात आले होते; परंतु फेब्रुवारी महिना उजाडला तरी कराची अवघी चाळीस टक्केच वसुली करणे प्रशासनाला शक्य झाले आहे. कराची देयके वेळेवर न निघणे, या विभागासाठी तयार करण्यात आलेल्या संगणक आज्ञावलीत असलेल्या अनेक त्रुटी, एकंदरच कर विभागात असलेला भोंगळ कारभार यासोबतच वर्ष संपले तरी कर न भरण्याची करदात्यांची सवय या सर्वाचा करवसुलीवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच सुस्तावलेल्या थकबाकीदारांना जागे करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. एकीकडे शासनाने स्थानिक संस्था कर रद्द केल्याने शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत असल्याने विकासकामांवर परिणाम होऊ नये यासाठी मालमत्ता कराची प्रभावी वसुली होणे आवश्यक आहे. परंतु आर्थिक वर्ष संपत आले तरी उद्दिष्टाच्या जवळपासही जाणे अद्याप शक्य झाले नसल्याने करवसुलीसाठी प्रशासनाची धावपळ उडाली आहे. अधिकाधिक नागरिकांनी कर भरावा यासाठी प्रशासन विविध उपाययोजना आखत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रमुख थकबाकीदारांच्या घरासमोर बॅण्ड वाजविण्याचा अनोखा उपाय प्रशासनाने योजला आहे. घरासमोर बॅण्ड वाजला तर किमान शरमेपोटी तरी नागरिक आपला थकीत कर भरतील, अशी आशा प्रशासनाला आहे.

बडय़ा थकबाकीदारांना जप्तीची वॉरंट बजावण्यात येणार असून थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करण्याचे आदेश याआधीच देण्यात आले आहेत. आवश्यक तेवढी करवसुली झाली नसल्याला कर्मचारीदेखील जबाबदार असल्याने दोषी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात येणार आहे. मात्र त्याचबरोबर वसुलीसाठी चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बक्षीसही देण्यात येणार आहे.

– विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त.