‘आमचा मुलगा ५८ टक्क्यांनी दहावी उत्तीर्ण झाला. परीक्षाही द्यायला तयार नव्हता. पास होतो की नाही, याची धास्ती वाटत होती!’
‘तुम्हाला माहितीच आहे आमची मुलगी कशी आहे. धड ना कॉलेजला हजेरी, ना घरी अभ्यास. सतत बाहेर मित्रांबरोबर आणि तो फोन..! पण तुमच्याकडून शिकलो तसे करत करत तिला मॅनेज केलं. ५४ टक्के पडले बारावीत.’
‘एवढा राग, छळवाद, उद्धटपणा आणि अडेलपणा करत होता. एवढी बुद्धी असून वाया जाते की काय वाटत होतं. पण गेले वर्षभर इथे येतोय. त्याचा फायदा झाला. त्याला ७६ टक्के गुण मिळालेत.’ आय.पी.एच.मधील कॉन्फरन्स हॉलमध्ये २०-२५ पालकांचा गट उत्साहाने गेल्या महिन्याचा आपापला अहवाल सांगताहेत. नुकत्याच लागलेल्या परीक्षांच्या निकालाचे संदर्भ त्यात आहेत. तुम्ही म्हणाल ५०-६० टक्क्यांचे इतके काय कौतुक? मात्र हे पालक आणि त्यांची मुले सर्वसाधारण, नेहमी भेटणाऱ्यातील नाहीत. अनेक चढउतार, टोकाच्या समस्या त्रागा- राग- चिंता- निराशा, या भावनांच्या गर्तेत असूनही नेटाने मार्ग काढत या टप्प्यावर आले आहेत.
हे आमच्या ‘एलओसी’ या पालक आधार गटाचे सदस्य आहेत. एलओसी म्हणजे युद्धाशी निगडित ‘लाइन ऑफ कंट्रोल’ नाही तर ‘लोकस ऑफ कंट्रोल’ अर्थात आपल्या भावभावनांचे, विचारांचे नियोजन नियंत्रित स्वरूपात विचार व्यक्त करायला शिकणे म्हणजे ‘एलओसी’ होय. काही व्यक्तींना अशा प्रकारे विचार करणे शक्य होत नाही. या स्वमदत गटात त्यांना नियंत्रित विचार शिकवले जाते. परिस्थिती व विशेषत: आपल्या ‘वेगळ्या’ व्यक्तिमत्त्व वैशिष्टय़ांकडे झुकणारी मुले, यावर अवलंबून न ठेवता, स्वत:कडे निग्रहाने ठेवायला शिकणे हा मूळ हेतू.
त्यांच्या मुलांचे (वय १५ वर्षांच्या वर) वर्तन पौगंडावस्थेतल्या काहीशा आक्रमक, भावनाप्रधान, सामाजिक व कौटुंबिक न जुमानणाऱ्या वृत्तीपेक्षा खूप वेगळे व तीव्र असते. अनेकदा ही अवस्था काही छुप्या व्यक्तिमत्त्व दोषांची नांदी असते. विशेषत: अ‍ॅन्टी सोशल व बॉर्डर लाइन. अर्थात व्यक्तिमत्त्वाची बीजे आपण जरी जन्मत: घेऊन येतो, तरी घर व समाजातले घटक, संस्कार, अनुभव यांचा प्रभाव त्यावर पडतो. साधारण १३-१४ वर्षांपासून स्वभावात व वर्तनात बदल जाणवू लागतात. उदा. अरेरावी, खोटे बोलणे, पैसे व किमती वस्तू घरातून लंपास करणे, टोकाची दमदाटी, मारहाण, कांगावा करणे, स्वार्थासाठी लबाडी करणे, स्वत:च्या चुकीच्या वागणुकीचे खापर खूप आवेशाने सतत इतरांवर फोडणे, कुटुंबीयांच्या भावनांची कदर नसणे, शाळा, महाविद्यालय बुडवणे, सिगरेट-दारू-गर्दच्या नशेकडे आकर्षित होणे, सामाजिक नियम, कायदे तोडणे, केलेल्या चुकीबद्दल खंत, अपराधीपणाचा लवलेश नसणे, स्वार्थी वृत्ती, छानछोकीची अत्यंत आवड व ती पुरवण्यासाठी कोणताही मार्ग अवलंबणे, भावनेच्या भरात जिवाचे बरेवाईट करण्याच्या धमक्या देणे – तशी कृत्येही करणे इत्यादी यादी करावी तेवढी थोडी.
असे काही होत असेल ही कुणकुण लागली तरी बरेचदा पालक ते खरे मानायला धजत नाहीत. मग अतिरिक्तपणा वाढला की सुरुवातीला पालक रागवून, समजूत घालून, शिक्षा करून, रडून, विनंत्या करून, धाक दाखवून, मारून हे वागणे कह्य़ात आणायचा खूप प्रयत्न करतात. या उपद्व्यापामध्ये २-३ वर्षे सहज जातात. त्या दरम्यान राग, चिंता, शरम, निराशा अशा अनेक पिळवटून टाकणाऱ्या, जायबंदी करणाऱ्या भावनांशी ते झगडत असतात. त्यामुळे ही परिस्थिती काबूत आणणे अधिकच कठीण होऊन जाते. त्या तणावामुळे पालक आधी काही अविचारी पावले उचलू शकतात. ज्याचा नंतर खूप पश्चात्ताप होतो.
आता हे दुष्टचक्र थांबवायचे कसे? एकटय़ाला न झेपणारे हे पर्व सल्ल्याने व एकमेकांच्या साहाय्याने, भावनिक आधार व शास्त्रशुद्ध माहितीच्या बळावर पेलणे शक्य होते. याच उद्देशाने आय. पी. एच. ठाणे. येथे आम्ही डिसेंबर २०११ ला एलओसी हा पालक कुटुंबीयांसाठी एक आधारगट सुरू केला. गेल्या ३ ते ५ वर्षांत २५ पेक्षा जास्त लोकांनी याचा फायदा घेतला आहे. महिन्याच्या पहिल्या रविवारी ३ ते पाच या वेळेत समूहाची बैठक होते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. फक्त मुलांच्या स्वभावप्रवृत्तीचे निदान एका तज्ज्ञाकडून केले गेले असणे गरजेचे आहे.
सुलभा सुब्रमण्यम
दूरध्वनी क्र. २५४३३२७०, २५४२८१८३.