वाढत्या शहरीकरणामुळे ठाणे जिल्ह्य़ातील अनेक शहरांत स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असले तरी या शहरांच्या राजकारणावर मात्र भूमिपुत्रांचेच वर्चस्व राहिले आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत ५७ पैकी १६ तर बदलापूरमध्ये ४७ पैकी २० नगरसेवक आगरी समाजाचे आहेत.
अंबरनाथ गाव, जांभिवली, बारकूचा पाडा, चिखलोली, कोहोज गाव, खुंटवली,  कानसई आदी मूळ गावठाणांमधून कायमच भूमिपुत्र उमेदवारांना उमेदवारी देण्यात सर्व पक्षांनी प्राधान्य दिले. यंदाच्या निवडणुकीतही हेच चित्र दिसून आल्याने अंबरनाथ पालिकेच्या निवडणुकीत आगरी समाजाचे १६ नगरसेवक निवडून आले आहेत, तर बदलापुरातही सेनेचे वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या २४ पैकी २० नगरसेवक आगरी आहेत.
अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदासाठी दोघींमध्ये चुरस
सुरुवातीची अडीच वर्षे अंबरनाथ शहराचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. शिवसेनेच्या दोन नगरसेविका अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभागातून निवडून आल्या आहेत. पश्चिम विभागातील सिद्धार्थनगर- आयुध निर्माणी कारखाना मंडई परिसर (प्रभाग क्र. १८) येथील छाया दिवेकर आणि पूर्व विभागातील नवरेनगर (प्रभाग क्र. ४०) येथील प्रज्ञा बनसोडे या दोघींपैकी एकीच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडणार हे निश्चित आहे.