राज्य सरकारकडे लवकरच प्रस्ताव

ठाणे महापालिका क्षेत्रातील स्थानिक तरुणांना यापुढे नोकर भरतीत ५० टक्के जागा आरक्षित करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमुखाने घेतला. यासंबंधीचा ठराव आता प्रशासनाकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या अंतिम मंजुरीनंतरच स्थानिकांना नोकर भरतीमध्ये ५० टक्के आरक्षण मिळू शकणार आहे.

ठाणे महापालिकेच्या पाणी आणि विद्युत विभागामध्ये विविध पदांसाठी तसेच वाहनचालक पदासाठी नुकतीच भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेसंदर्भात भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी प्रशासनाला प्रश्न विचारले होते.

त्याची उत्तरे प्रशासनाकडून दिली जात असतानाच महापालिका नोकर भरतीत स्थानिकांना डावलले जात असल्याचा संशय नगरसेवकांनी व्यक्त केला.

ठाणे महापालिका भरतीमध्ये राज्यातील अन्य जिल्ह्य़ातील उमेदवारांची निवड करण्यात येते. त्यामध्ये ठाणे शहरातील स्थानिकांचे प्रमाण नगण्य असते. ठाणे शहरात हुशार मुलांची कमतरता नसतानाही भरतीमध्ये मात्र त्यांची निवड होताना दिसत नाही, असा मुद्दा उपस्थित करत नगरसेवक नारायण पवार यांनी नोकर भरतीबाबत संशय व्यक्त केला.

या सर्वावर तोडगा काढण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नोकर भरतीमध्ये स्थानिकांसाठी जागा आरक्षित करण्याचा ठराव करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याची सूचना सभागृहाला केली. त्यानुसार महापालिका विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील यांनी महापालिका क्षेत्रातील स्थानिक तरुणांना यापुढे नोकर भरतीमध्ये ५० टक्के जागा आरक्षित करण्याचा ठराव मांडला. त्यास सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर हा ठराव लवकरच मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी या वेळी दिले.

केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत ठाणे शहरातील युवक आणि युवती चांगले यश संपादन करतात; मात्र महापालिका नोकर भरतीमध्ये स्थानिकांची निवड होत नाही. त्यामुळे या भरतीबाबत संशयाला वाव निर्माण होतो.

राम रेपाळे, नगरसेवक शिवसेना</strong>