ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसने दिलेल्या धडकेत सौराष्ट्र एक्स्प्रेसच्या लोको पायलटचा मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी बोईसर स्थानकात ही दुर्घटना घडली. गाडी साईडिंगला उभी असताना इंजिनाची पाहणी करण्यासाठी लोको पायलट खाली उतरले होते. त्यावेळी हा अपघात झाला.

मुंबईहून जामनगरला जाणारी सौराष्ट्र एक्स्प्रेस (१९२१७ सौराष्ट्र जामनगर एक्स्प्रेस) रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास बोईसर स्थानकात फलाट क्रमांक १ वर साईडिंगला उभी होती. फलाट क्रमांक २ च्या रुळावरून राजधानी एक्स्प्रेस जाणार होती. त्यावेळी सौराष्ट्र एक्स्प्रेसचे लोको पायलट उमेशचंद्र आर हे इंजिनाची पाहणी करम्ण्यासाठी खाली उतरले होते. सव्वासातच्या सुमारास दिल्लीच्या दिशेने जाणारी ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस (१२९५३) भरधाव वेगाने फलाट क्रमांक २ च्या रुळावरून गेली. त्या वेगाने शेजारच्या रुळावर खेटून उभे असलेले उमेशचंद्र आर ऑगस्ट क्रांतीच्या खाली ओढले गेले. गंभीर जखमी अवस्थेतील उमेशचंद्र यांना तारापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित केले.

पालघर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. दुसरा लोको पायलट आल्यानंतर ८ वाजता सौराष्ट्र एक्स्प्रेस पुढे नेण्यात आली. उमेशचंद्र यांची डय़ुटी वलसाड येथे संपणार होती.