‘आरोग्यमान भव’ला उदंड प्रतिसाद ल्ल आजही ठाण्यात कार्यक्रम
महानगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे आहार, विहार आणि विचारांमध्ये कमालीचा बदल झाला आहे. अशा जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या शारीरिक, मानसिक आरोग्यविषयक समस्यांवरील उपायांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘आरोग्यमान भव’ या कार्यक्रमाला शुक्रवारी ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. आपल्या आरोग्यसंपन्नतेचा मंत्र जाणून घेण्यासाठी भल्या सकाळीच ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा सभागृहाबाहेर जमलेले नागरिक परिसंवाद आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळालेली आरोग्याची गुरुकिल्ली घेऊनच घरी परतले. आज, शनिवारी पुन्हा एकदा ‘आरोग्यमान भव’चा कार्यक्रम होणार असल्याने संधी हुकलेल्या नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
टिप-टॉप प्लाझा सभागृहात सकाळी नऊ वाजता सुरू होणाऱ्या ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासूनच नागरिकांची गर्दी जमली होती. ठरलेल्या वेळेत सुरू झालेल्या या कार्यक्रमात वैद्य शैलेश नाडकर्णी यांनी ‘आहारातून आरोग्य’, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशीष देशपांडे यांनी ‘ताणतणाव आणि आरोग्य’, तर डॉ. राजेंद्र आगरकर यांनी ‘मधुमेह आणि रक्तदाब’ या तीन विषयांवर विवेचन केले. त्यानंतर या तज्ज्ञांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरेही दिली. त्यात आहार, जीवनशैली, मानसिक तणाव, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या विषयीच्या शंकांचा अधिक समावेश होता. ही समस्या किती गंभीर रूप धारण करत आहे, याचीही प्रचीती प्रेक्षकांच्या प्रश्नांतून आली. तज्ज्ञ मंडळींनीही केवळ प्रश्नापुरते मर्यादित न राहता विस्तृतपणे उत्तरे देऊन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्यविषयक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. शहरातील नामांकित अशा संस्थांचे प्रदर्शन स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले आहेत.
या स्टॉलवरून उपस्थित ज्येष्ठ आणि मध्यमवगीय नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे वैद्यकीय सल्ले, तपासण्या आणि शरीरातील स्थुलपणाची मोफत माहिती करून दिली गेली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि मध्यंतराच्या वेळी तसेच कार्यक्रमाच्या शेवटी या स्टॉलवर नागरिकांनी भेटी देऊन आरोग्यविषयक माहिती करून घेतली.

संधी चुकवू नका!
शुक्रवारी ‘आरोग्यमान भव’ या कार्यक्रमात सहभागी होता न आलेल्यांना आज, शनिवारी ही संधी मिळणार आहे. टिप-टॉप प्लाझा, एल. बी.एस. मार्ग, ठाणे (प.) येथे सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रवेशिका कार्यक्रमस्थळीच ३० रुपये शुल्क भरून मिळवता येतील.