‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमात आज ठाणेकरांशी संवाद

भांडवली बाजारातील उत्साही वातावरण ओसरल्याचे दिसत असून, त्याला अस्थिरतेने वेढले आहे. दुसरीकडे ठेवींवरील व्याज दर घसरत आहेत, बरोबरीने महागाईत वाढही सुरू आहे. या परिस्थितीत आपल्या पैशाची भविष्यात वाढ होईल तर ती कशी या सर्वसामान्यांपुढे असणाऱ्या प्रश्नाचे समाधान करणारे गुंतवणूकविषयक मार्गदर्शन ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमांतून रविवारी ठाण्यात केले जाणार आहे.

‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ मार्गदर्शन रविवार, २० ऑगस्ट २०१७ रोजी  सकाळी १०.३० वाजता हॉटेल टिपटॉप प्लाझा, एल. बी. एस. रोड, मुलुंड चेक नाक्याजवळ, ठाणे (पश्चिम) येथे आयोजिण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वासाठी खुला व विनामूल्य आहे. कार्यक्रमाकरिता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे.

सनदी लेखापाल प्रशांत चौबळ हे गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन साध्य करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करतील. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची ओळख करून देतानाच त्यांची वैशिष्टय़े, जोखीमेचे संतुलन साधून त्यातून मिळणारा परतावा याबाबतची स्पष्टता ते देतील.

शेअर बाजारातील तेजी ही अनेकांना भुरळ घालणारी आहे. परंतु म्युच्युअल फंडांमार्फत गुंतवणूक करून, बाजाराच्या तेजीचा लाभ मिळविता येतो.  सध्याच्या काळात जोखीम टाळून निर्धास्तता मिळविता येणाऱ्या म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवणुकीच्या पर्यायांचा ऊहापोह ‘लोकसत्ता-अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक वसंत माधव कुलकर्णी या कार्यक्रमात करतील. फंडांचे प्रकार, त्यांच्या कार्यपद्धतीवरही ते यावेळी भाष्य करतील. कार्यक्रमाला उपस्थित गुंतवणूकदारांना त्यांच्या मनांतील प्रश्न थेट तज्ज्ञ वक्त्यांना विचारून त्याचे समाधान करून घेता येईल.