‘लोकसत्ता अर्थसल्ला’ मार्गदर्शन सत्र रविवारी ठाण्यात

प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे आणि वस्तू व सेवा करप्रणालीशी जुळवून घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उर्वरित वित्त वर्षांतील आर्थिक नियोजन करणे क्रमप्राप्त आहे. ते करताना गुंतवणुकीतून उत्तम आर्थिक नियोजन करता आले तर उत्तम. आणि त्याचबरोबर म्युच्युअल फंड आणि शेअर गुंतवणुकीचा मेळ साधता आला तर सुवर्णमयी घटनाच. हे सहज साध्य करण्यासाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चे साहाय्यही असायलाच हवे. त्यामुळेच येत्या रविवारी ठाण्यात ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चे आगामी सत्र रविवारी, २० ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी १०.३० वाजता हॉटेल टिपटॉप प्लाझा, एल. बी. एस. रोड, मुलुंड चेक नाकाजवळ, ठाणे (पश्चिम) येथे होत आहे. त्याकरिता प्रवेश सर्वासाठी खुला आणि विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.

सनदी लेखापाल प्रशांत चौबळ हे यावेळी गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन कसे साध्य करता येईल यावर मार्गदर्शन करतील. गुंतवणुकीचे विविध पर्याय, सद्यस्थितीतील त्यातील परतावा व तुलना त्याचबरोबर भविष्यातील तजवीज करण्याच्या हेतूने त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ते यावेळी विशद करतील. पारंपरिक मुदत ठेवींचे घसरते व्याजदर, मौल्यवान धातू, स्थावर मालमत्तेतूनही कमी होत असलेला परतावा आदी उदाहरणांची किनार त्यांच्या मार्गदर्शनाला असेल.

भांडवली बाजाराने पुन्हा तेजीगिरकी घेतली असताना व म्युच्युअल फंड गंगाजळी २० लाख कोटी रुपयांच्या उंबरठय़ावर असताना हे दोन्ही पर्याय, त्यातील गुंतवणूक, परतावा आदींवर ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक वसंत माधव कुलकर्णी हे प्रकाश टाकतील. भांडवली बाजाराचा तेजी प्रवास व बाजाराशी संबंधित घटकांचा म्युच्युअल फंडांच्या परताव्यावरील परिणाम याचे गणित ते यावेळी उलगडून दाखवतील.