ठाणेकरांसाठी रविवारी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ मार्गदर्शन सत्र

बँकांचे सातत्याने घसरत चाललेले ठेवींवरील व्याजदर, सोने, घरासारख्या पर्यायातून मिळणारा तुलनेत कमी परतावा, अशा स्थितीत स्थिर मात्र अधिक आकर्षक गुंतवणूक कशी राहील याबाबतचे मार्गदर्शन ‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. त्याचबरोबर वरच्या टप्प्याला पोहोचलेले भांडवली बाजारांचे प्रमुख निर्देशांक, समभागांच्या वाढीचा म्युच्युअल फंडांना होणारा फायदा हेही यानिमित्ताने उलगडवून दाखविले जाणार आहे.

‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चे हे गुंतवणूकपर मार्गदर्शन सत्र येत्या रविवारी, २० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता हॉटेल टिप टॉप प्लाझा, एल. बी. एस. रोड, मुलुंड चेक नाकाजवळ, ठाणे (पश्चिम) येथे होणार आहे. या कार्यक्रमाकरिता  प्रवेश सर्वासाठी खुला आणि विनामूल्य आहे. तसेच प्रथम येणाऱ्यास कार्यक्रमासाठी प्राधान्य आहे.

चालू महिन्याच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणापूर्वी बँकांचे ठेवीवरील व्याजदर कमी होऊ लागले आहेत. कर्ज व्याजदर त्या प्रमाणात कमी होत नसताना स्थिर उत्पन्न देणारा हा पर्याय परताव्याच्या दृष्टीने निस्तेज बनू पाहत आहे. अशा वेळी जोखीम कमी असलेल्या गुंतवणूक पर्यायाबाबत काय धोरण ठेवावे याबाबतचे मार्गदर्शन सनदी लेखापाल प्रशांत चौबळ हे करतील. गुंतवणुकीचे विविध पर्याय, त्यातील जोखीम व परतावा, निर्धारित लक्ष्य आदींचीही सांगोपांग चर्चा करतील.

मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक पुन्हा एकदा विक्रमाच्या दिशेने प्रवास करू पाहत आहे. सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग मूल्यही वरच्या टप्प्याला आहे. अशा वेळी त्याचा म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीवर कसा परिणाम होतो? फंडातील गुंतवणुकीबाबत आगामी कालावधीत काय धोरण ठेवावे याविषयी ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक वसंत माधव कुलकर्णी हे मार्गदर्शन करतील. फंडांचे प्रकार, त्यांची वैशिष्टय़े आदी सर्व ते या वेळी सोदाहरणासह उलगडवून दाखवतील.