डोंबिवलीतील स्फोटात बचावलेला कर्मचारी मंगेश मानकरच्या भावना
सहा-सात महिन्यांपूर्वीच कामाला लागला असलो तरी कंपनीतील कर्मचारी व मालक एका कुटुंबातील असल्यासारखेच होतो. कौटुंबिक सलोख्याचे आमचे संबंध होते. गुरुवारी सकाळी झालेल्या स्फोटाने आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून अख्खे कुटुंब मी यात गमावले आहे. यातून कसे सावरायचे हेच मला अजून समजले नसल्याने मोठय़ा मालकांशी मी अद्याप संपर्क साधलेला नाही. तो आवाज आजही कानात घुमत असून आजचा तिसरा दिवस असूनही माझ्या काळजाचा ठोका आजही चुकतो, असे सांगताना मंगेश मानकर याच्या भावनांचा बांध फुटला. या कंपनीतील काम करणारा मंगेश हा एकमेव कर्मचारी या घटनेतून वाचला असल्याने त्याचे दैव बलवत्तर होते असेच म्हणावे लागेल.
गुरुवारी सकाळी डोंबिवलीतील औद्योगिक परिसरातील प्रोबेस कंपनीत झालेल्या स्फोटाने अख्खी डोंबिवली हादरली. या स्फोटात झालेल्या जीवित व वित्तहानीने डोंबिवलीकर सुन्न झाले असून यातून सावरायला त्यांना एक महिन्याचा अवधी तरी लागेल. प्रोबेस कंपनी पूर्णत: बेचिराख झाली असून या कंपनीच्या मालकांचाही या दुर्घटनेत बळी गेला आहे. असे असताना यातील कर्मचारी मंगेश मनोहर मानकर (२८) हा मात्र या दुर्घटनेतून आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे.
प्रकृती स्थिर
येथील शिवम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मंगेश दाखल असून त्याच्या उजव्या हातात काचा घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.
मंगेश मानकर हा भोपर येथे आई व पत्नी यांच्यासोबत राहतो. दहावीपर्यंत त्याचे शिक्षण झाले आहे.
गुरुवारी सकाळी कामावर माझ्यासोबत किशोर भोसले, सुशांत कांबळे व मयूरेश वायकुळे हे तिघे हजर होते. आम्ही चौघे कंपनीच्या पाठीमागील प्लॅण्टमध्ये सोडा बनविण्याच्या ड्रममध्ये पाणी भरत होतो. नंदन वाकटकर सर आम्हाला पुढील प्रकल्पाची माहिती देत होते. काही नवीन मुले आम्हाला भरती करायची होती, त्याविषयी चर्चा सुरू होती. तर सुमित सर व स्नेहल मॅडम कंपनीच्या ऑफिसमध्ये बसले होते. तेवढय़ात कंपनीच्या आत स्फोट झाल्याचा आवाज आमच्या कानावर पडला. आम्हाला काही कळण्याच्या आत दुसरा मोठा स्फोट झाला म्हणून आम्ही सगळे जिवाच्या आकांताने पळालो, या वेळी मी अल्कोहोलने भरलेल्या ड्रमवर पडलो. पाठीमागे वळून पाहिले तर आगीचा लोट आणि काळा धूर दिसला. आगीचा लोट येत असल्याने कंपनीच्या संरक्षक भिंतीवरून मी पाठीमागील बिल्डिंगमध्ये उडी मारली. या वेळी भिंतीवरील काचा माझ्या हातात घुसल्या. तेथील काही नागरिकांना मी मदतीसाठी इशारा केला आणि त्यांनी मला उचलले, एवढेच मला आठवते. त्यानंतर मी रुग्णालयात होतो.

हे एक कुटुंबच
विश्वास वाकटकर सरांची मुले आणि सून हे आम्हाला वडीलधाऱ्यांसारखेच होते. आम्ही मुले नवीन असून आम्हाला कामाची जास्त माहिती नसल्याने ते सतत आम्हाला मुलांसारखे समजावत असत. काही चुकले तरी ओरडलेदेखील नाहीत. या स्फोटात तिघेही गेल्याचे समजल्याने मी पोरका झालो आहे. विश्वास सरांशी संपर्क साधण्याचीही मला हिंमत होत नाही.