‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत प्रसिद्ध कथांच्या नाटय़ाविष्कारांवर भर

साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गज लेखकांच्या साहित्यकृतींमधून नाटय़ाविष्कार तयार करण्याचा प्रयत्न यंदाही लोकांकिका स्पर्धेत तरुण कलाकारांकडून होताना दिसत आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ व्यासपीठावर विद्यार्थ्यांनी जागतिक दर्जाचे लेखक आणि भारतीय साहित्यातील मान्यवरांच्या साहित्यकृतींवर आधारित एकांकिका सादर करण्यास प्राधान्य दिले आहे. साहित्यकृतींमधील व्यक्तिरेखांचा जिवंत अनुभव देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

ठाण्यातील ‘लोकांकिका’च्या प्राथमिक फेरीमध्ये निवड झालेल्या पाच एकांकिकांपैकी तीन एकांकिका या मोठय़ा लेखकांच्या साहित्यकृतींवर आधारलेल्या आहेत. त्यामध्ये जर्मन लेखक फ्रेंझ काफ्का, इरफान मुजावर आणि राजन खान यांच्या कथांचा समावेश असून त्यांचे नाटय़रूपांतर करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे.

डिजिटल युगात वावरणाऱ्या महाविद्यालयीन युवकांमध्ये अद्यापही जुन्या, मोठय़ा लेखकांच्या साहित्यकृतींविषयी कमालीचे आकर्षण दिसत आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून आंतरराष्ट्रीय आणि भारतीय साहित्याचाही वेध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्राथमिक फेरीत सादर झालेल्या एकांकिकांमध्ये बहुतांश एकांकिका या साहित्यकृतींवर आधारित होत्या. विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकांकिकांपैकी तीन एकांकिका मोठय़ा लेखकांच्या साहित्यकृतींवर आधारलेल्या आहेत. ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयाने ‘असणं-नसणं’ ही एकांकिका सादर केली असून ही एकांकिका लेखक राजन खान यांच्या कथेवर आधारलेली आहे. श्रेयस राजे याने या कथेचे नाटय़रूपांतर केले आहे. तर ‘इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कम्प्युटर स्टडीज ठाणे’ या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘मजार’ ही एकांकिका सादर केली. लेखक इरफान मुजावर यांच्या कथेवर आधारलेली ही कथा आहे. तर कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘हंगर आर्टिस्ट’ ही एकांकिका सादर केली. जर्मन लेखक फ्रेंझ काफ्का यांच्या ‘अ हंगर आर्टिस्ट’ या मूळ कथेवर ही एकांकिका आधारलेली आहे. लेखक अमेय सावंत याने या कथेचे एकांकिकेमध्ये रूपांतर केले आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकांकिकांमध्ये कथांवरून नाटय़रूपांतर केलेल्या एकांकिका लक्षवेधी ठरत होत्या. त्याच बरोबर काही विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वतंत्र लिखाणाचा प्रयत्नही दाद देण्यासारखा होता. नव्या पिढीतील ही साहित्य सजगता अधिक महत्त्वाची ठरत असून त्याचे दर्शन या निमित्ताने होत आहे.

 – अनिल बांदिवडेकर, परीक्षक

अनेक दिग्गज साहित्यिकांनी खूप चांगले आणि सकस लेखन करून ठेवले आहे. त्यांच्याकडे अनेक वेळा लक्ष जात नसले तरी या सकस विषयांवर काम होण्याची गरज आहे. ‘अ हंगर आर्टिस्ट’ ही कथा वाचल्यानंतर त्याचे मराठीत नाटय़रूपांतर करण्याची इच्छा होती. बिर्ला महाविद्यालयाच्या एकांकिकेच्या निमित्ताने ही कथा रंगमंचावर सादर करण्याची संधी आम्हाला मिळू शकली. एक चांगला आणि सकस विषय हाताळण्याचा आनंद या निमित्ताने मिळाला आहे.

– श्रीपाद चौधरी, बिर्ला महाविद्यालय, कल्याण</strong>