तिसऱ्या पर्वाची पहिली घंटा वाजली; पाच महाविद्यालये विभागीय अंतिम फेरीत

गणपती बाप्पा मोरयाचा गजर..नेत्रदीपक नेपथ्याची जुळवाजुळव..उत्कृष्ट सादरीकरणासाठी तरूणाईमधील धाकधुक..आशयघन संवाद..आणि प्रेक्षागारातील वाहवा..अशा जल्लोषपूर्ण वातावरणात ठाण्यातील ज्ञानसाधना विद्यानिकेतन  महाविद्यालयात रविवारी ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या तिसऱ्या पर्वाची पहिली घंटा वाजली. ठाण्यातील ११ महाविद्यालयांनी या स्पर्धेत भाग घेऊन नाटय़कला सादर केली. यापैकी पाच महाविद्यालयांची निवड ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. त्यात ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालय, ज्ञानसाधना महाविद्यालय, एमकॉस्ट, विरारचे विवा महाविद्यालय, कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाचा समावेश आहे. या महाविद्यालयांची विभागीय अंतिम फेरी गुरूवार, ८ डिसेंबरला गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे.

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि केसरी क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी, पुणे व झी युवा यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची प्राथमिक फेरी ठाण्यात पार पडली. आयरिस प्रॉडक्शन हे टॅलेण्ट पार्टनर असून अस्तित्व या संस्थेच्या सहकार्याने झालेल्या या स्पर्धेला ठाण्यातील महाविद्यालयांनी भरघोस प्रतिसाद दिला.

नात कळण्यासाठी माणूस व्हाव लागत..बाईपणापेक्षा तिच्या आईपणाचे सौंदर्य जास्त असते..नात्याकडे गुंता म्हणून बघण्यापेक्षा आधार म्हणून बघा..एखाद्याला जगवण्याइतके मोठे शिक्षण जगात नाही..अ‍ॅडव्हॉन्स होण्याच्या नादामध्ये माणूसपण विसरतो आहोत, अशा आशयघन संवादाची पेरणी करत जगण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सांगण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला. महाविद्यालयीन तरुणांचा जल्लोष, एकांकिकेच्या माध्यमातून हाताळलेले गेलेल्या वेगवेगळ्या धाटणीचे विषय, उत्तम अभिनयाचा शोध घेण्यासाठी परिक्षकांची चोख पडताळणी या सगळ्यांचे दर्शन यावेळी घडले. या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून निळकंठ कदम आणि अनिल बांदिवडेकर उपस्थित होते. सॉफ्ट कॉर्नरचे दिलीप कुलकर्णी आणि अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक केले. तर आयरिस प्रॉडक्शनच्या मधुरा महंत आणि सुवर्णा राणे यांनीही मुलांमधील कलागुणांना दाद दिली. प्रत्येक लोकांकिकेच्या सादरीकरणानंतर परिक्षाकांकडून महाविद्यालयीन कलाकारांना सूचनाही देण्यात येत होत्या.

अनाथ अर्भकांचा प्रश्न, पाणीटंचाई, सीमेवरील सैनिक आणि तेथील समाजजीवन, लैंगिकतेकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देणारे तसेच स्त्रीपुरूष समानतेवर भाष्य करणाऱ्या विविधरंगी लोकांकिका यावेळी सादर करण्यात आल्या. परिक्षकांनी ही त्यातील पाच लोकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडल्या आहेत. ठाणेकर रसिकांना गुरूवार, ८ डिसेंबरला वेगळ्या धाटणीच्या पाच एकांकिका पाहण्याची संधी मिळणार असून, त्यातील एक लोकांकिका राज्यस्तरीय स्पर्धेत ठाणे जिल्ह्य़ाचे प्रतिनिधीत्व करू शकणार आहे.

आज नाशिकमध्ये प्राथमिक फेरी

ठाण्यात ‘लोकसत्ता लोकांकिका’ची जोरदार नांदी केल्यानंतर नाशिकमध्ये आज, सोमवारी प्राथमिक फेरी होणार आहे. महाकवी कालिदास मंदिराच्या तालीम हॉलमध्ये पहिल्यांदाच नाशिककर तरूणांबरोबर जळगावमधील नाटय़वेडी मंडळीही रंगमंचावर आपला नाटय़ाविष्कार करण्यासाठी सज्ज झाली आहेत. के. के. वाघ महाविद्यालय, डी. वाय. के. महाविद्यालयाबरोबरच त्र्यंबकेश्वर महाविद्यालय, एच. पी. टी. महाविद्यालय, भोसला सैनिकी महाविद्यालय अशा वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या या रंगमंचावर उतरली आहेत. विद्यार्थ्यांचे अभिनय गुण पारखण्यासाठी खुद्द ‘आयरिस प्रॉडक्शन’चे प्रमुख विद्याधर पाठारे या प्राथमिक फेरीला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याबरोबर ‘आयरिस’चेच विवेक रनावडेही या फेरीत सहभागी होणार आहेत.

विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झालेली महाविद्यालये

१) विवा महाविद्यालय, विरार – दिल- ए -नादान

२) बिर्ला महाविद्यालय, कल्याण – हंगर आर्टिस्ट

३) जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे – असणं-नसणं

४) सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे – रात्रीस खेळ चाले

५) इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडिज, ठाणे – मजार

स्पर्धेत सहभागी झालेली महाविद्यालये

१) शंकर नारायण महाविद्यालय, भाईंदर – सेकंण्ड हॅण्ड

२) अभिनव कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स, भाईंदर – सेव्हन लाईन

३) सतीष प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे – रात्रीस खेळ चाले

४) के.एल.ई. कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स, नवी मुंबई- पाणी रे

५) कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी – दंद्व

६) बिर्ला महाविद्यालय ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स, कल्याण – हंगर आर्टिस्ट

७) विवा महाविद्यालय, विरार – दिल ए नादान

८) जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे – असणं-नसणं

९) डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, बेलापूर – ट्रान्सियाचे जैविक युध्द

१०) इंस्टिटय़ुट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडिज, ठाणे-मजार

११) श्री सिद्धी ठाकुरनाथ कॉलेज ऑफ आर्टस अ‍ॅण्ड कॉमर्स, उल्हासनगर – लपाछपी