ठाणे विभागीय अंतिम फेरीची तिसरी घंटा; पाच महाविद्यालये, पाच लोकांकिका आणि नाटय़रसिकांचा रंगोत्सव!

रंगदेवता आणि नाटय़रसिकांना विनम्र अभिवादन करून ठाण्यातील पाच निवडक महाविद्यालये आज, गुरुवारी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या विभागीय अंतिम फेरीत सर्वोत्तम प्रयोग सादर करून बाजी मारण्याचा प्रयत्न करणार आहेत. शेकडो दर्जेदार रसिकांच्या उपस्थितीत गडकरी रंगायतनमध्ये ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी पार पडत आहे. वैविध्यपूर्ण विषयांची रेलचेल, देखणे नेपथ्य, सरळ साधे संवाद, मनाला भिडणारा अभिनय अशा वैशिष्टय़ाने यंदाची ‘लोकांकिका’ रंगणार असून त्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयाची ‘असणं-नसणं’, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘रात्रीस खेळ चाले’, आयएमकॉस्ट महाविद्यालयाची ‘मजार’, बिर्ला महाविद्यालयाची ‘हंगर आर्टिस्ट’ आणि विवा महाविद्यालयाची ‘दिल-ए-नादान’ या पाच एकांकिकांमध्ये ही विभागीय अंतिम फेरीची चुरस रंगणार आहे. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि केसरी क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमी, पुणे व झी युवा यांच्या सहकार्याने लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आयरिस प्रॉडक्शन हे टॅलेण्ट पार्टनर असून अस्तित्व या संस्थेच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे. महाविद्यालयांच्या भरघोस प्रतिसादानंतर पार पडलेल्या प्राथमिक फेरीत निवडण्यात आलेल्या पाच एकांकिका एकमेकांशी लढत देणार आहे. या पाच लोकांकिकांमधून एका लोकांकिकेची निवड मुंबईमध्ये होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिके’च्या महाअंतिम स्पर्धेसाठी होईल.

विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या लोकांकिकांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत महाविद्यालयाच्या आवारामध्ये रंगीत तालीम केली. लोकांकिकेच्या व्यासपीठावर उतरताना कुठेही कमी पडू नये याची पुरेशी काळजी स्पर्धाकांकडून घेतली जात होती. जे दर्जेदार आहे ते लोकांपर्यंत पोहचवायचे, स्पर्धेतील यश मिळो अथवा अपयश आले तरी हरकत नाही. परंतु लोकांकिकेच्या रंगमंचावर आपले नाटय़कृती दर्जेदार स्वरूपात सादर करण्याचा निर्धार प्रत्येक महाविद्यालयाच्या कलाकारांनी व्यक्त केला.

प्रायोजक

‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘केसरी’, ‘क्रिएटिव्ह अकॅडमी, पुणे’ व ‘झी युवा’ यांच्या सहकार्याने होत असलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेची महाअंतिम फेरी ‘झी युवा’ या वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर आहेत, तर ‘अस्तित्व’ या संस्थेची या स्पर्धेसाठी मदत होत आहे.

तालीम प्रकृती सांभाळून

महाविद्यालयाचे सभागृह किंवा तालमीचे ठिकाण संपूर्ण दिवस एकांकिकेच्या प्रत्येक अंगाची बारीक चाचपणी विद्यार्थ्यांकडून बुधवारी करण्यात आली. विभागीय अंतिम फेरीमध्ये कलाकारांचे आवाज व्यवस्थित लागावेत, ऊर्जा कमी पडू नये, अतिरिक्त तालमींचा ताण कलाकारांवर पडू नये, यासाठी पडद्यामागील कलाकारांकडून खास काळजी घेतली जात होती. कलाकारांचा अभिनय १०० टक्के रसिकांपर्यंत पोहचावा यासाठी बुधवारी योग, व्यायामांचीही सत्रे विद्यार्थ्यांसाठी घेतली जात होती.

आज विभागीय अंतिम फेरी

  • स्थळ: गडकरी रंगायतन, ठाणे.
  • वेळ : सायं. ४ वाजता.