विषयाची मुद्देसुद मांडणी, विस्तृत विवेचन आणि विषयाच्या दोन्ही बाजू उलगडण्याचा प्रयत्न.. ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ स्पर्धेच्या निमित्ताने तरुणाईतील वक्तृत्वाचे दर्शन रविवारी सायंकाळी ठाणेकरांना घडले. मान्यवर परीक्षक आणि ठाण्यातील सुजाण रसिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांनी आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून ठाणेकर रसिकांची मने जिंकली. ठाणे विभागीय अंतिम फेरीतून रिद्धी म्हात्रे हिला विजेतेपद मिळाले असून ती १४ फेब्रुवारी रोजी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिरात होणाऱ्या महाअंतिम फेरीमध्ये ठाण्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
ठाण्यातील प्राथमिक फेरीतील ४० वक्त्यांशी स्पर्धा करून अंतिम फेरीमध्ये पोहचलेल्या आठ वक्त्यांनी पाच विषयांवर आपले विचार मांडले. त्यामध्ये पनवेलच्या पिल्लाई महाविद्यालयाच्या रिद्धी म्हात्रेने प्रथम क्रमांक पटकावला. विद्या प्रसारक मंडळाच्या विधी महाविद्यालयातील स्वानंद गांगल याने द्वितीय पारितोषिक, सी. एच. एम. महाविद्यालय, उल्हासनगरच्या अविनाश कुमावतने तृतीय पारितोषिक पटकावले. तसेच जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्रज्ञा पोवळे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या स्पर्धेतून विजेतेपद मिळाले नसले, तरी चांगली गोष्ट केल्याची भावना मात्र यानिमित्ताने निर्माण झाल्याची भावना स्पर्धकांनी व्यक्त केली आहे.

मी या स्पर्धेत भाग घेण्याचे सलग दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षीही मी ठाणे विभागीय फेरीची प्रथम विजेती होते. महाअंतिम फेरीमध्ये काही कारणास्तव मला यश प्राप्त झाले नाही. मला यंदा पुन्हा महाराष्ट्राचा वक्ता होण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. यावेळी मी महाअंतिम फेरी जिंकण्याचा नक्की प्रयत्न करेन. मला बोलण्याचा, माझे विचार मांडण्याचा आत्मविश्वास दिला, त्याबद्दल मी ‘लोकसत्ता’ची खूपखूप आभारी आहे.
– रिध्दी म्हात्रे, प्रथम विजेती

मी स्वत: कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळे ‘भारत एक संघराज्य’ हा विषय तसा माहितीचा होता. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून या विषयाचा मी चौकस विचार करून अभ्यास केला. त्यामुळे मला विषयाची खोली कळली. याचा मला माझ्या पुढील अभ्यासक्रमासाठी नक्कीच फायदा होईल. आजवर अनेक स्पर्धामध्ये मी सहभाग घेतला. त्या तुलनेत ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ या स्पर्धेचे नियोजन अतिशय सुंदर होते. तसेच या स्पर्धेला एक वेगळी उंची प्राप्त झाल्यामुळे स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे. पुढच्या वर्षी यशस्वी होण्याचा प्रयत्न करीन.
– स्वानंद गांगल, द्वितीय विजेता

महाराष्ट्राला वक्त्यांची परंपरा आहे. तरुणपिढी वक्तृत्वाकडे दुर्लक्ष करताना दिसते. मात्र ‘लोकसत्ता’ने उपलब्ध करून दिलेले हे व्यासपीठ चांगला वक्ता तयार करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. भारतात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी वाणी हे शस्त्र आहे. या स्पर्धेत उत्तेजनार्थ येण्याचा मान मिळाला पण त्याहीपेक्षा अधिक परीक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आज स्पर्धेने माझ्यातील वक्त्याला व्यासपीठ दिले असून, यापुढील स्पर्धेला अधिक तयारी आणि सखोल अभ्यास करेन.
– प्रज्ञा पोवळे, उत्तेजनार्थ

‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धा ही युवकांच्या विचारांना चालना देणारी स्पर्धा आहे. युवा पिढी विचार करत नसल्याचे सर्वत्र म्हटले जाते. मात्र आम्ही विचार करतो हे दाखवून देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने व्यासपीठ नव्हे तर विचारपीठ उपलब्ध करून दिले आहे. मनात चाललेल्या विचारांना मी मुक्तपणे तसेच अभ्यासपूर्ण मांडले. त्यामुळे आज तृतीय येण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्रात चांगला वक्ता तयार करण्याचे काम या माध्यमाद्वारे होत असून राज्याचे तसेच केंद्राचे नेतृत्व करण्यासाठी चांगला वक्ता असणे अतिशय गरजेचे आहे.
– अविनाश कुमावत, तृतीय क्रमांक