पाच प्रांतांतील नामवंत शेफशी मुक्त संवाद; पारंपरिक, प्रांतिक आणि वैशिष्टय़पूर्ण खाद्यपदार्थाची चविष्ट मैफल

शिरवळ्या, गटगिळं, उकडपेंडी, बाजरीचे उंडे, शेवेची भाजी, वांग्याचे भरीत, गुरमयरोटी, आंबोली भात, वांगीभात, बेसनभात, चिंचेची कढी, खसखसची भाजी अशा एकाहून एक सरस पारंपरिक आणि प्रांतिक खाद्यपदार्थाची ओळख ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’च्या निमित्ताने ठाणेकर रसिकांना करून घेता आली. गुरुवारी सायंकाळी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये रंगलेल्या या कार्यक्रमास शहरातील खवय्यांनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली होती. केवळ महिला आणि ज्येष्ठच नव्हे तर तरुणाईनेही या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन नवनव्या पाककृतींचे रसग्रहण केले.

Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
buldhana, Daughter in law, Lead Social Revolution, Perform Last Rites, Father in law, Gunj village, Sindkhed Raja, marathi news, maharashtra,
बुलढाणा: चौघी सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री-पुरुष समानतेचे उदाहरण
viva
सफरनामा: होली खेले मसाने में..
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

महाराष्ट्रातील पाच प्रांत आणि त्यातील वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतींची ओळख करून देणारे त्या ठिकाणचे नामवंत शेफ हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाणेकरांनी या शेफशी संवाद साधत स्वयंपाकघरातील अनेक क्लृप्त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना तितक्याच आत्मीयतेने मोहसिना मुकादम, मंजिरी कपडेकर, आशालता पाटील, सायली राजाध्यक्ष आणि विष्णू मनोहर या पाच शेफनी उत्तरे देत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

महाराष्ट्रातील भौगोलिक रचनेनुसार पाच प्रमुख भाग पडत असून येथील निसर्ग आणि पर्यावरणानुसार तेथील राहणाऱ्या नागरिकांच्या खाण्याचे पदार्थ आणि सवयी वेगवेगळ्या आहेत. या खाद्यपदार्थ आणि चवींचा उलगडा ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या वार्षिकांकाच्या निमित्ताने केला जात आहे. उपस्थित नामवंत आचाऱ्यांनी त्या त्याप्रदेशाच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून दिली. निसर्गसमृद्ध कोकणातील सात्त्विक खाद्यपदार्थ, कोल्हापूरमधील तांबडा आणि पांढऱ्या रश्शापलीकडचे खाद्यपदार्थ, खान्देशातील लोकप्रिय खाद्यपदार्थ, मराठवाडय़ातील साधा, सोपा आहार, तर संपूर्ण भारताचा केंद्रबिंदू असणाऱ्या विदर्भातील संमिश्र खाद्यसंस्कृती खवय्यांसमोर मांडण्यात आली. या पदार्थाची कृतीही दृक्-श्राव्य पद्धतीने ठाणेकरांसमोर सादर करण्यात आली. आंबट-गोड, चवदार, ठसकेबाज आणि नानाविविध चवींचा खजिना या वेळी ठाणेकरांसमोर खुला करून देण्यात आला होता. सध्या फारसे प्रचलित नसणारे हे खाद्यपदार्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीला जागतिक पातळीवर नेण्याचे आवाहन या आचाऱ्यांनी यानिमित्ताने केले.

कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रामध्ये ठाणेकरांनी उपस्थित मान्यवर आचाऱ्यांना प्रश्न विचारून शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. परदेशी खाद्यपदार्थाच्या बरोबरीने घराघरांमध्ये महाराष्ट्रीय पद्धतीचे खाद्यपदार्थ बनवण्याचे आवाहन या वेळी या मान्यवरांनी केले. शेकवणे, भाजणे, तळणे हे अन्नपदार्थ शिजविण्याचे विविध प्रकार असले तरी त्यापासून निर्माण होणारी चव निरनिराळी असते.

शेफ हे परिपूर्ण करिअर

सध्याचा विद्यार्थी वर्ग करिअरचा वेगवेगळ्या अंगांनी विचार करू लागला आहे. एक काळ असा होता की, शेफ बनण्याचे स्वप्न पाहाणारे फारच तुरळक होते. या करिअरला समाजवर्तुळातूनच मान्यता नसल्यासारखी स्थिती असायची. आता मात्र परिस्थिती बदलत असून याकडे पूर्णवेळ करिअर म्हणून पाहाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. एखादा पदार्थ बनविणे ही कला असून त्यासाठी विविध प्रकारचे गुण तुमच्या अंगी असावे लागतात. त्यामुळे शेफ बनण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या मुलामुलींना तुम्ही रोखू नका, असा सल्ला या वेळी नामवंत शेफ विष्णू मनोहर यांनी उपस्थितांना दिला.

‘विम’ने प्रस्तुत केलेल्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ अंकाचे ‘एलजी’ हे सहप्रायोजक असून ‘टेस्ट पार्टनर’ रामबंधू आहेत. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘केसरी’, ‘आयुशक्ती’ यांचे या उपक्रमाला पाठबळ लाभले आहे तर, ‘कलर्स मराठी’ टेलिव्हिजन पार्टनर आहेत.

वाचकांकडून स्वागत

माणूस म्हणून खाणे ही आपली गरज आहे. खाद्यपदार्थ आणि माणूस हे एक अतूट समीकरण आहे. वृत्तपत्र म्हणून वाचकांच्या एकूण गरजा लक्षता घेऊन त्यांच्यासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम लोकसत्ता सातत्याने राबवीत असते. त्यामुळे वाचकांचे आणि वृत्तपत्राचे नाते अधिक घट्ट होत जाते. पूर्णब्रह्म कार्यक्रमामुळे नेहमीच्या वरण-भात, पोळी-भाजीतून काही काळ का होईना सुटका मिळेल अशी अपेक्षा आहे. पूर्णब्रह्मच्या माध्यमातून महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जपण्याचे व्रत लोकसत्ताने घेतले आहे. त्यामध्ये आम्हा वाचकांना समाविष्ट करून घेतल्याबद्दल धन्यवाद.

 – रामचंद्र माळी, डोंबिवली

भौगोलिकदृष्टय़ा वेगवेगळ्या प्रांतातील खाद्यसंस्कृतीची ओळख ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ उपक्रमामुळे एकाच व्यासपीठावर झाली. नामवंत शेफच्या चर्चेतून प्रांतानुसार पाककलेत वैविध्य कसे येते हे समजण्यास मदत झाली. प्रत्येक शेफ वेगवेगळ्या प्रांताच्या खाद्यपदार्थासाठी खास असल्याने मुलाखतीच्या माध्यमातून पदार्थ बनवण्याचे भौगोलिक वेगळेपण कळले. खाद्यसंस्कृतीशी जोडला जाणारा लोकसत्ता पूर्णब्रह्म उपक्रम स्तुत्य आहेच, याशिवाय पूर्णब्रह्म अंकाचा गृहिणींना विविध पाककृती बनवण्यासाठी उपयोग होईल.

– कल्पना कढणे, माटुंगा

लोकसत्ता पूर्णब्रह्म’ उपक्रमाला मनापासून शुभेच्छा. पाककलेची आवड असणाऱ्या आणि एखादा पदार्थ खास पद्धतीने बनवण्याचा आग्रह असणाऱ्या प्रत्येकासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. पूर्णब्रह्म अंकात प्रसिद्ध शेफनी लिहिलेल्या पाककृती असल्याने गृहिणींना याचा खूप उपयोग होईल.

– विभा राणे, माहीम

मी स्वत: होम सायन्स केलं आहे. त्यामुळे माझ्या क्षेत्राशी निगडित अशा कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला. या कार्यक्रमामुळे विस्मृतीत गेलेल्या अनेक गोष्टींचे पुन्हा स्मरण झाले. लोकसत्ता पूर्णब्रह्मसारख्या दर्जेदार कार्यक्रमामुळे आम्हाला खाद्यसंस्कृतीची पुन्हा नव्याने ओळख झाली. त्यासाठी लोकसत्ताचे मनापासून आभार. आम्हाला मोठ-मोठय़ा नामवंत शेफना ऐकण्याची संधी लोकसत्तामुळे मिळाली. त्यासाठी खरंच धन्यवाद. वाचकांसाठी अशाच प्रकारचे चांगले कार्यक्रम लोकसत्तातर्फे घेण्यात यावेत.

– अर्चना दामले, ठाणे</strong>

असे कार्यक्रम अविरत सुरूच राहावेत असे वाटते. दर्जेदार वक्त्यांशी आमचा संवाद घडवून आणल्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्ताने दैनंदिन जीवनात पडणाऱ्या प्रश्नांचे निसरण झाले. नामवंत शेफसोबत थेट संवादाचा आनंद काही औरच होता. शिवाय काळाच्या ओघात विस्मरणात गेलेले काही पदार्थ पुन्हा पाहायला मिळाले. नामवंत शेफसोबत थेट संवाद करण्याची एक उत्तम संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला मिळाली. कार्यक्रमामुळे खाद्यपदार्थाची परिपूर्ण माहिती मिळाली.

– युगंधरा वाळसंगकर, मुलुंड