वैधमापन विभागाच्या कारवाईच्या निषेधार्थ ठाण्यातील दूध व्यावसायिकांनी पाच नामांकित ब्रॅण्डच्या दुधाची विक्री बंद केल्याने दुय्यम तसेच कमी दर्जाच्या दुधाचा खप वाढू लागला आहे. त्यामुळे गोवर्धन, रंजन, शहीद अशा ब्रॅण्डच्या दुधाची विक्री केली जात आहे.
शीतपेटीच्या नावाखाली जादा दराने दुधाची विक्री करणाऱ्या दूध व्यावसायिकांवर वैधमापन विभागाने कारवाईचा बडगा उगारल्यामुळे धास्तावलेल्या ठाणे शहरातील दूध व्यावसायिकांनी बुधवारपासून पाच प्रसिद्ध ब्रॅण्डच्या दुधाच्या विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये महानंद, गोकुळ, अमूल, वारणा आणि मदर डेअरी या पाचही प्रसिद्ध ब्रॅण्डच्या दुधाचा समावेश आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या दुधाची विक्रीच बंद
झाल्याने ग्राहकवर्ग मोठय़ा प्रमाणात शहरातील दूध डेअऱ्या तसेच गोठय़ांकडे वळला आहे.
मात्र, ठाणे शहरातील अनेक गोठे बंद अवस्थेत असून या ठिकाणी मर्यादित स्वरूपाचा दूधसाठा असल्याने एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दुधाचा पुरवठा करू शकणार नाही, असे चंदनवाडी भागातील गोठा व्यावसायिक सुरेंद्रकुमार पाठक यांनी सांगितले. तर ठाण्यातील पाश्चराइज दूध विक्रेत्यांऐवजी दुय्यम ब्रॅण्डच्या दूध कंपन्यांना या बहिष्काराचा फायदा होत असल्याचे पाचपाखाडी येथील निर्मल दूध डेअरीचे मालक अगरवाल यांनी सांगितले.

आंदोलनाचा वणवा पेटला..
ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा तसेच पनवेल भागांत विक्रेत्यांनी पाच ब्रॅण्डवर बहिष्कार घातल्याने ९० टक्के आंदोलन यशस्वी झाले असून यापाठोपाठ आता कल्याण-डोंबिवली आणि मुंबईतील घाटकोपर, कांदिवली, बोरिवली भागांतील विक्रेत्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे याकरिता त्यांच्यासोबत बैठक सुरू आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.
* ठाणे शहरात दररोज सुमारे दहा लाख लिटर दूध विक्रीसाठी येते. त्यामध्ये महानंद, गोकुळ, अमूल, वारणा आणि मदर डेअरी या पाच प्रसिद्ध ब्रॅण्डचे सुमारे चार लाख लिटर दूध असते.
* दूध व्यावसायिकांच्या बहिष्कारामुळे शहरात सध्या गोर्वधन, कृष्णा, गोदावरी, हुतात्मा, प्रभात, गोविंद, हेरिटेज, रंजन आणि शहीद आदी दुधाची विक्री वाढली  आहे.
* गोर्वधन दूध कंपनीचे एक ते दीड लाख लिटर आणि इतर कंपन्यांचे २० ते २५ हजार लिटर दुधाचा पुरवठा शहरात सुरू आहे.
* उन्हाळी सुट्टय़ांचा कालावधी असल्याने अनेक कुटुंबीय बाहेरगावी गेल्याने दुधाची मागणी कमी प्रमाणात आहे, अशी माहिती ठाणे दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेचे सहसचिव पांडुरंग चोडणकर यांनी दिली.

विनित जांगळे, ठाणे