कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची धग शमते न शमते तोच आता मुंबईपासून जवळच असलेल्या कल्याणजवळील शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे. सरकारने जबरदस्तीने नेवाळी विमानतळासाठी जमिनी संपादित केल्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन मार्गावरील वाहतूक रोखून धरली. तसंच पोलिसांची वाहने पेटवली.

कल्याणजवळील नेवाळीजवळील विमानतळाच्या जागेचा प्रश्न चिघळला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सैनिकांना ने-आण करण्यासाठी आणि मालवाहू विमाने उतरवण्यासाठी ब्रिटिशांनी नेवाळी येथे विमानतळ सुरू केले होते. या विमानतळासाठी ब्रिटिशांनी त्यावेळी शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केल्या होत्या. काही वर्षांनी त्या जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात आल्या होत्या. पण आता या जमिनी नौदलाकडे हस्तांतरित करण्यात आल्याचं गेल्या वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. यावर्षी नौदलानं या जागेवर दावा करत तिथं कुंपण टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याला
शेतकऱ्यांनी विरोध केला असून, आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन मार्गावर आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी कल्याण-मलंगगड रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. तसेच वाहनांचे टायर जाळून मलंगगडकडे जाणारी वाहतूक रोखली. पोलिसांची वाहनेही पेटवली. तसेच पोलिसांवर दगडफेकही केली.

शेतकऱ्यांना पेरणी करण्यास अटकाव केल्यानंतर शेतकऱ्यांचा भडका उडाला. गावातील सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरुवात केली. यावेळी शेतकऱ्यांचा आक्रोश एवढा होता की,आंदोलनकर्त्यांनी पोलिसांच्या २ गाड्या जाळल्या तर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांपैकी १० ते १२ पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली. त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, आणि ५ महिला पोलीस कर्मचार्यांसह इतर पोलीस शिपायांचा समावेश आहे. यात ४ ते ५ आंदोलन करते देखील जखमी झाल्याचे समजते. घटना स्थळी पोहचलेल्या काही पत्रकारांना देखील यावेळी आंदोलन कार्त्यांकडून मारहाण केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला. सध्या पोलीस बंदोबस्त वाढवला असून आता पोलिसांना आंदोलनकर्त्यांना शांत करण्यात यश आले आहे.