कल्याण डोंबिलली परिसरात फांद्यांचे ढीग

पावसाळापूर्वी वीज वाहिन्यांना लागलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याची कामे महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहेत. फांद्या तोडल्यानंतर त्या उचलण्याची व्यवस्था महावितरणकडे नसल्याने कल्याण-डोंबिवलीतील अनेक भागांत तुटलेल्या फांद्यांचे ढीग पडले आहेत.

महापालिकेने एकीकडे शहर स्वच्छतेसाठी मोहिमा आखल्या आहेत. व्हिजन डोंबिवलीचे कार्यकर्ते विविध टप्पे करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून झाडांच्या फांद्या तोडण्याच्या मोहिमेबद्दल रहिवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. झाडांच्या फांद्या तोडून झाल्या की फांद्यांचा पसारा तसाच टाकून कर्मचारी निघून जात आहेत. या फांद्यांच्या कचऱ्याला महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी हात लावीत नाहीत. या फांद्या झाडांच्या अवतीभोवती, सोसायटींच्या संरक्षित भिंतीवर पडून राहत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली पूर्व, पश्चिमेत महावितरणकडून फांद्या तोडण्याची मोहीम सुरू आहे. तुटलेल्या फांद्या मात्र महावितरणचे कर्मचारी उचलत नाहीत. महावितरणने झाडे तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर तुटलेल्या फांद्या जमा करण्यासाठी एक ट्रक द्यावा आणि त्या फांद्या योग्य ठिकाणी नेऊन टाकाव्यात, अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.  डोंबिवलीत पश्चिमेतील महात्मा फुले रस्ता, नवापाडा, गरीबाचावाडा भागातील रस्त्यांवर झाडांचा फांद्या पडलेल्या आहेत. काही ठिकाणी या फांद्या वाहतुकीला अडथळा ठरत आहेत.