कमीत कमी विद्युतपुरवठय़ावर जास्त प्रकाश देणाऱ्या एलईडी बल्बचा वापर करून ऊर्जाबचत करावी या उद्देशाने ठाणे शहरात ‘एलईडी लावा, वीज वाचवा’ अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानाच्या माध्यमातून अत्यल्प किमतीमध्ये नागरिकांना बल्बचे वाटप करण्याची योजना महावितरणने सुरू केली आहे.  या उपक्रमांतर्गत पुढील दोन महिन्यांमध्ये ५० हजार कुटुंबीयांपर्यंत एलईडी बल्ब पोहचवण्याचा संकल्प आहे.
कमी पावसामुळे वीजनिर्मिती केंद्र बंद पडू लागली असून महाराष्ट्रात विजेचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. विजेची गरज आणि मागणी मोठी असताना त्याप्रमाणात पुरवठा होत नसल्याने शहरामध्ये आणीबाणीचे भारनियमन करण्याची वेळ महावितरणवर येऊन ठेपली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी एलईडीचा वापर केल्यास मोठय़ा प्रमाणात ऊर्जाबचत होऊ शकते. त्यामुळे एलईडीचा जास्तीत जास्त वापर व्हावा या उद्देशाने महावितरणच्या वतीने एलईडी वाटपाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते सोमवारी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गेल्या महिन्यामध्ये मुंबईमध्ये एलईडीवाटप उपक्रम झाल्यानंतर आता ठाण्यामध्ये हा उपक्रम हाती घेण्यात आला असून सुमारे ५० हजार कुटुंबांपर्यंत हे बल्ब पोहचवण्यात येणार आहेत.
एलईडीचे वितरण प्रक्रिया..
या उपक्रमांतर्गत प्रत्येक घरासाठी चार बल्ब देण्यात येणार असून एका बल्बची बाजार मूल्य ४०० रुपये आहे. मात्र या उपक्रमांतर्गत केवळ शंभर रुपयांमध्ये एक बल्ब देण्यात येणार आहे. एकूण १६०० रुपये किंमत असलेले हे बल्ब केवळ ४०० रुपयांमध्ये वीज ग्राहकांना मिळू शकणार आहेत. या बल्बसाठी नागरिकांनी गेल्या महिन्याच्या वीजबिलाची मूळ प्रत, झेरॉक्स, तसेच आधारकार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड यांपैकी एकाची मूळ प्रत व झेरॉक्स या शिबिरांच्या ठिकाणी सादर करणे गरजेचे आहे. ज्या कुणाला ४०० रुपये देऊन बल्ब विकत घेता येणार नाही, अशांना त्यांच्या महिन्याच्या विजेच्या बिलातून दरमहा ४० रुपये रक्कम आदा करून घेतली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांवर बल्बचा अतिरिक्त भार येणार नाही.