डोंबिवली पूर्व एमआयडीसी परिसरातील गांधीनगरजवळ प्रो-बेस एंटरप्रायझेस कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू, तर ८० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की परिसरातील दोन ते तीन किलोमीटर परिघामध्ये त्याचा आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. कंपनीची संपूर्ण इमारत या स्फोटामध्ये उदध्वस्त झाली आहे. त्याचबरोबर या कंपनीच्या शेजारील दोन कंपन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी करून रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. जखमींना आवश्यक ती सर्व मदत शासन करेल, असे त्यांनी सांगितले.
जखमींवर डोंबिवली आणि परिसरातील एम्स, शांतिहोम, रुक्मिणी, नेपच्यून आणि आयकॉन या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनास्थळी आपत्ती निवारण पथकाचे जवान दाखल झाले असून, ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का, याचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येतो आहे.
डोंबिवलीतील केमिकल कंपन्या इतरत्र हलविण्यासाठी लवकरच धोरण – सुभाष देसाई
स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की त्यामुळे प्रो-बेस कंपनीच्या जवळपास असलेल्या कंपन्या आणि घरांच्या काचा फुटल्या. तसेच परिसरातील गाड्यांचाही काचा फुटल्या. स्फोटामुळे कंपनीनजीक असलेल्या काही घरांवरचे पत्रेही हवेत उडाले. स्फोटामुळे सकाळी गांधीनगर परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे काहीवेळ लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
स्फोटावेळी कंपनीजवळ असलेल्या इमारतींना हादरे बसल्याचे स्थानिकांनी सांगितले. सुरुवातीला भूकंप झाल्यासारखेच काहींना वाटले पण त्यानंतर नजीकच्या कंपनीमध्ये स्फोट झाल्याचे स्पष्ट झाले. स्फोटानंतर अनेक ठिकाणी काचांचा ढिग पाहायला मिळला. स्फोट झालेल्या कंपनीमध्ये ७५ कर्मचारी आहेत. त्यापैकी किती कामावर होते, याचा तपास करण्यात येतो आहे, अशी माहिती ठाण्याचे पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली.
PHOTOS : केमिकल कंपनीतील स्फोटामुळे धूराचे साम्राज्य आणि काचांचा खच
ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पीडितांना सर्वोतोपरी मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कंपनीतील बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली.

blast-dombivali