५ ठार, १२५ जखमी : रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट; पाच किलोमीटपर्यंत हादरे, ढिगारे उपसणे सुरूच, मृतांची संख्या वाढण्याची भीती
डोंबिवली औद्योगिक वसाहत परिसरात गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता प्रोबेस एन्टरप्राईसेस कंपनीत रासायनिक भट्टीचा शक्तीशाली स्फोट होऊन पाचजण ठार तर १२९ जण जखमी झाले. स्फोटानंतर लागलेल्या आगीत कंपनी भस्मसात झाली असून पाच किलोमीटरचा परिसर स्फोटाने हादरल्याने डोंबिवलीत भयकंप पसरला. ढिगारे उपसण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते आणि त्यामुळे मृतांचा व जखमींचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली. जखमींमध्ये कामगारांची संख्या मोठी असून सर्वावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींचा सर्व खर्च सरकार उचलेल तसेच या स्फोटाची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनास्थळी भेट दिल्यानंतर केली.
स्फोटात महेश पांडे (२५) हा प्रोबेस कंपनीतील कामगार जागीच ठार झाला. कंपनीत बैलगाडीतून बर्फाची ने-आण करणारा ज्ञानेश्वर हजारे हादेखील जागीच ठार झाला. त्याचे दोन्ही बैल जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करण्याचेही भान कोणाला नव्हते. त्यामुळे एक बैल गतप्राण झाला. दुसऱ्या बैलाला स्थानिकांनीच पाणी पाजले आणि पशुवैद्यांनाही बोलावल्याने त्याची प्रकृती सुधारत आहे. राजू शिरगीरे, नीलम देठे हे संध्याकाळी मरण पावल्याचे जाहीर करण्यात आले. एका मृताची ओळख अद्याप पटलेली नाही.
डोंबिवली एमआयडीसी भाग पूर्वी शहराबाहेर होता. मात्र त्याला खेटून आता निवासी वस्त्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे स्फोटाने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले.

स्फोट कशामुळे?
रासायनिक प्रक्रियेत गडबड झाल्यामुळे भट्टीचा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी काढला आहे. बॉयलरचा स्फोट इतका भीषण असू शकत नाही, असा दावाही केला जात आहे. रासायनिक अभिक्रिया सुरु असताना परिस्थिती हाताबाहेर गेली असावी, त्यामधून हा प्रकार घडला असावा, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

कानाचे पडदे फाटले..
स्फोटाच्या आवाजाने २१ दिवसांच्या एका लहान बाळाचे कानाचे पडदे फाटले. इंडियन मेडिकल असोसिएशनचे हेमराज इंगळे यांनी तातडीने या बाळाला खासगी रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू केले.

होत्याचे नव्हते..
स्फोटात दगावलेल्या महेश पांडे याचा गेल्याच महिन्यात विवाह झाला होता, असे त्याच्या मावशीने सांगितले. त्याचे आई -वडील उत्तर प्रदेशाहून निघाले असले तरी त्याच्या पत्नीला काय सांगावे, हे आम्हालाच कळत नसल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

रक्तदानासाठीही गर्दी
स्फोटानंतर शहरातील अनेक रुग्णालये जखमींनी तसेच त्यांच्या नातेवाईकांनी भरली होती. ज्यांना आप्तांचा पत्ता लागत नव्हता ते सर्वच रुग्णालयात धाव घेत होते. जखमींवरील उपचारांसाठी रक्ताची गरज लागेल, हे लक्षात घेऊन अनेक नागरिकांनी रक्तदानासाठीही रक्तपेढय़ांत गर्दी केली होती.

‘रासायनिक उद्योग हलविणार’
डोंबिवली एमआयडीसी व निवासी विभाग एकदम
जवळ आले आहेत. निवासी विभागातील जीवनमानाचा विचार करता औद्योगिक विभागातील रासायनिक कंपन्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा विचार करण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी दुर्घटनास्थळी भेट दिल्यानंतर केली.

मालकाचे आप्तही बेपत्ता
प्रोबेस कंपनी ही डॉ. विश्वास वाकटकर यांनी १९८४मध्ये सुरू केली आहे. या स्फोटात त्यांचा मुलगा नंदन वाकटकर (३२) तसेच सुमीत वाकटकर (३०) आणि सून स्नेहल वाकटकर (२८) हे तिघे तसेच सुशांत कांबळे (२६) हा तरुणही बेपत्ता झाला आहे. ढिगाऱ्याखाली त्यांचा शोध सुरू आहे.आनंद केमचे मालक आनंद व श्रीकांत हे आचार्य बंधूही स्फोटात जखमी झाले.

* प्रोबेस कंपनीलगतच्या आचार्य ग्रुपच्या हरब्रेट ब्राऊन, रामसन्स परफ्युम्स, फाइन आर्ट्स केमिकल कंपन्यांचीही बरीच मोडतोड झाली.
* एमआयडीसी, सागर्ली ते कोळसेवाडी, शिळफाटापर्यंत स्फोटाचे आवाज गेले. तब्बल पाच किलोमीटर परिसराला स्फोटाचा हादरा जाणवला.