बनावट कागदपत्रांच्या आधारे १५ हजार मोबाइल सीमकार्ड कार्यान्वित; ७ जणांना अटक

घरातील संगणकावर बनावट कागदपत्रे बनवून त्याआधारे मोबाइल सीमकार्ड कार्यान्वित करायचे आणि त्यानंतर कागदपत्रांअभावी सीमकार्ड मिळत नसलेल्या ग्राहकांना जास्त किमतीत विकायचे.. असा प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून भिवंडीत सुरू होता. ही धक्कादायक बाब ठाणे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाली आहे. या मोबाइल विक्रीच्या रॅकेटप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १५ हजार मोबाइल सीमकार्ड तसेच बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत. विशेष म्हणजे, १५ हजारांपैकी ११ हजार सीमकार्ड कार्यान्वित असल्याचे तपासात उघड झाले आहे.

भिवंडी येथील कामतघर परिसरात कागदपत्रांशिवाय सीमकार्ड कार्यान्वित करून त्याची विक्री होत असल्याची, माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनिटला मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने कामतघर परिसरात धाड टाकून सात जणांना अटक केली. त्यामध्ये संदीपकुमार भगवानदास गुप्ता (२८), अनिल रामसुभक सिंह (२२), बंडु दत्तु भाकरे (३५), गणेश भीमसेन नेलवाडे (२४), सिराज अहमद रियाज अहमद अन्सारी (४०), ज्ञानप्रकाश रामदेव गुप्ता आणि अल्तमश मंजुर अन्सारी या सात जणांचा समावेश आहे. स्वप्निल सूरदास पाटील यांची ‘ओमसाई कनेक्टिविटी’ नावाची कंपनी असून ते टेलीनॉर मोबाइल कंपनीचे वितरक आहेत. त्यांच्या कंपनीत संदीपकुमार आणि अनिल हे दोघे व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. तर बंडू आणि गणेश हे दोघे टेलीनॉर कंपनीचे अधिकारी आहेत. स्वप्निल यांच्या दुकानात टाकलेल्या धाडीदरम्यान ४६० बनावट कागदपत्रे, मोबाइल सीमकार्ड खरेदी अर्ज आणि दुकानाच्या नावाचे ६० शिक्के जप्त केले आहेत.

कार्यान्वित सीमकार्ड घरात सापडले

भिवंडी परिसरात राहणारा सिराज अन्सारी याच्या घरामध्ये पोलिसांना बनावट कागदपत्रांसह सीमकार्डचा साठा सापडला. त्यामध्ये वेगवेगळ्या नागरिकांचे ४९ हजार ९६७ पारपत्र आकाराचे फोटो, ९४०० बनावट आधारकार्डाच्या तर ३०७२ बनावट निवडणूक ओळखपत्राच्या छायांकित प्रती, मोबाइल सीमकार्ड खरेदीसाठी लागणारे अर्ज कार्यान्वित केलेले ११,३४५ सीमकार्ड आणि कार्यान्वित न केलेले ३६६० सीमकार्ड, सीमकार्ड कार्यान्वित करण्यासाठी वापरलेले ११० मोबाइल, दोन संगणक आणि प्रिंटरचा समावेश आहे. सिराजने राहत्या घरामध्येच अश्रफी या नावाने मोबाइल दुकान थाटले होते. या दुकानाच्या आडूनच तो बनावट कागदपत्रे बनवून त्याआधारे सीमकार्ड कार्यान्वित करायचा आणि ज्ञानप्रकाश व अल्तमश या दोघांकडे विक्रीसाठी देत होता. एका सीमकार्ड मागे त्याला ३५ रुपये मिळत होते.

फेसबुकचा आधार

सिराज हा घरातील संगणकावर बनावट कागदपत्रे तयार करायचा. त्याने निवडणूक ओळखपत्र आणि आधारकार्डचा साचा संगणकांमध्ये तयार करून ठेवला होता. फेसबुकवरील वेगवेगळ्या नागरिकांचे प्रोफाईल फोटो डाऊनलोड करायचे आणि ते संगणकाच्या माध्यमातून निवडणूक ओळखपत्र किंवा आधारकार्डावर चिकटवायचे. त्यानंतर त्या कागदपत्रांवर खोटे नाव आणि पत्ते टाकून त्याच्या छायांकित प्रती काढून त्याआधारे मोबाइल कंपन्यांकडून सीमकार्ड कार्यान्वित करत होता. तसेच या प्रकरणात मोबाइल कंपन्यांमधील अधिकाऱ्यांचा सहभागाचा संशय असल्याने त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.