कळवा पूल, रस्त्यांची कामे यामुळे क्रीकनाका परिसरात ‘चक्का जाम’

सुरक्षिततेच्या कारणास्तव कळवा खाडीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीस बंद करण्यात आल्यामुळे नवी मुंबई, ठाणे येथून ये-जा करणाऱ्या वाहनांची नियमित कोंडी होत असताना याच भागात साकेत मार्गावरील रस्त्याच्या कामामुळे या कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे ठाणे, साकेत आणि सिडको या तीन दिशेने येणाऱ्या वाहनांनी क्रीकनाका परिसरात चक्का जाम होत असल्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. या मार्गावरून गर्दीच्या वेळेत पाच मिनिटांचे अंतर कापण्यासाठी प्रवाशांना पाऊण तासाचा कालावधी लागत आहे.

ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडण्यासाठी खाडीवर दोन पूल आहेत. त्यापैकी ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच पुलावरून वाहतूक सुरू आहे. साकेत कॉम्प्लेक्स, ठाणे कारागृह आणि ठाणे स्थानक हे मार्ग कळवा पुलाजवळील क्रीकनाक्याजवळ येऊन मिळतात. या मार्गावर वाहनांची ये-जा करण्यासाठी प्रत्येकी चार अशा एकूण १२ मार्गिका आहेत. कळवा पुलावर मात्र चारच मार्गिका आहेत. त्यामुळे येथे मोठी कोंडी होत असते. ही कोंडी सुटावी यासाठी क्रीकनाका भागात तिन्ही मार्गावरील वाहतूक काही काळ रोखून सोडली जाते. त्यामुळे तेथेही कोंडी होऊ लागली आहे. या मार्गावर सकाळ आणि सायंकाळ अशा गर्दीच्या वेळेत वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या वेळेत या मार्गावरील पाच मिनिटांच्या अंतर पार करण्यासाठी पाऊण तास लागतात, असे तेथील वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. सुट्टीचा काळ असल्यामुळे सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ६ ते १० या वेळेत वाहतूक कोंडी होते. सुट्टीचा काळ नसेल त्यावेळेस सकाळी ७ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत वाहतूक कोंडी असते. जून महिन्यात शाळेची वाहने सुरू झाल्यानंतर पुन्हा कोंडीत वाढ होईल, असेही पोलिसांनी सांगितले घोडबंदर तसेच भिवंडी भागातील अनेक वाहने नवी मुंबईत जाण्यासाठी साकेत मार्गाचा वापर करतात. नवी मुंबईत जाण्यासाठी साकेत जवळचा मार्ग असल्यामुळे चालक या मार्गाने वाहतूक करतात. तसेच मीनाताई ठाकरे चौकात उड्डाण पुलाच्या कामामुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी अनेक चालक या मार्गाने वाहतूक करतात. मात्र, या मार्गावर असलेल्या नाल्यावर पूल उभारणीचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावरील काही मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चार मार्गिका असलेल्या या मार्गावर वाहतुकीसाठी केवळ दोन मार्गिका उपलब्ध होत आहे. त्यात अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक संथगतीने होत आहे.

अंतर आणि प्रवासाचा कालावधी

* साकेत कॉम्प्लेक्स ते कळवा नाका

* अंतर १.९ किमी, प्रवासासाठी लागणारा वेळ ६ मिनिटे

* वाहतूक कोंडीमुळे लागणारा वेळ – अर्धा ते पाउण तास

* साकेत कॉम्प्लेक्स ते ठाणे स्थानक

* अंतर २.७ किमी, प्रवासासाठी लागणारा वेळ ८ मिनिटे

* वाहतूक कोंडीमुळे लागणारा वेळ – पाऊण तास

* ठाणे कारागृह ते कळवा नाका

* अंतर ८५० किमी, प्रवासासाठी लागणारा वेळ ३ मिनिटे

* वाहतूक कोंडीमुळे लागणारा वेळ – अर्धा तास

* ठाणे स्थानक पश्चिम ते कळवा नाका

* अंतर २.३ किमी, प्रवासासाठी लागणारा वेळ  ८ मिनिटे

* वाहतूक कोंडीमुळे लागणारा वेळ – अर्धा ते पाउण तास