घरात माणसे कितीही असली तरी आपल्या विरंगुळ्यासाठी प्रत्येक व्यक्ती काहीना काही कारण शोधत असते. कुणी पुस्तकांच्या सान्निध्यात रमतात तर कुणी आपले मनोरंजन दूरचित्रवाणी आणि संगणकावर शोधतात. काही व्यक्तींना मात्र या सगळ्यापेक्षा मुक्या प्राण्यांसोबत वेळ घालवण्यास आवडतो. प्राण्यांवरच्या प्रेमापोटी किंवा एकटेपणा दूर करण्यासाठी अनेक घरांत श्वानपालन केले जाते. या श्वानाने घराचे रक्षण करावे हा यामागचा हेतू नसतो. दिवसभराच्या कामाच्या व्यापातून घरी आल्यावर या मुक्या जनावराच्या हालचालींतून चांगला विरंगुळा होता. श्वान हे तर कुटुंबातले एक सदस्यच बनते. केवळ विरंगुळा या उद्देशाने घरात पाळणाऱ्या श्वानांचे प्रकारही वेगळे आहेत. या श्वानांना ‘टॉय ब्रीड’ असेही संबोधतात. कॉकर स्पॅनिअल, पोमेरिअन अशा ‘टॉय’ श्वान ब्रीड प्रकारात मोडणारे श्वान म्हणजे ‘माल्टीज’.
इटली आणि माल्टा या ठिकाणी ‘माल्टीज’ या श्वानांचे मूळ सापडले. रोमन साम्राज्यात या ब्रीडचा मोठय़ा प्रमाणात प्रसार झाला. रोमन काळात उच्चभ्रू घरातील स्त्रियांना ‘माल्टीज’ हे ब्रीड खूप आवडायचे. यासाठी ‘माल्टीज’ या श्वानांना ‘रोमन लेडीज डॉग’ या नावाने संबोधायचे. सतराव्या शतकात या ‘माल्टीज’ श्वानांचे संदर्भ आढळले. पुडल, स्पॅनिअल अशा प्रकारचे नऊ वेगवेगळे ब्रीड एकत्रित करून ‘माल्टीज’ ब्रीड तयार केले आहे. रोमनमधून युरोपियन देशांत आल्यानंतर ‘माल्टीज’ श्वानांचा खूप मोठय़ा प्रमाणावर जगभरात प्रसार झाला.
दिसायला गोंडस हेच वैशिष्टय़
टॉय ब्रीड अशी ‘माल्टीज’ श्वानांची ओळख असल्याने दिसायला हे कुत्रे अतिशय गोंडस असतात. आकाराने लहान असलेले हे या कुत्र्यांचा संपूर्ण घरात उत्साहाने वावर पाहायला मिळतो. गोंडस आणि सुंदर दिसण्याच्या आपल्या वैशिष्टय़ामुळे शोभिवंत कुत्रे अशी ‘माल्टीज’ यांची ओळख आहे.
आकाराने लहान असल्याने ‘माल्टीज’ या कुत्र्यांची साधारण उंची ८ ते १० इंच असते. या कुत्र्यांचे वजन साधारणपणे तीन ते पाच किलो एवढे असते. या कुत्र्यांचा रंग पूर्णपणे पांढरा असतो. शरीरावर लांब केस असल्याने या श्वानांच्या शारीरिक सौंदर्यात भर पडते. दिसायला हे कुत्रे लहान असले तरी धीट असतात. घाबरणे हा त्यांचा स्वभाव नाही. अत्यंत गोंडस दिसणारे हे कुत्रे आपल्या सौंदर्यासाठीच बाजारात खूप जास्त किंमतीत विकले जातात. ऐंशी हजार ते एक लाख एवढय़ा किंमतीत हे श्वान बाजारात मिळतात. कामासाठी या कुत्र्यांचा उपयोग होत नाही. मात्र विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण या कुत्र्यांना मिळाल्यास हे कुत्रे आज्ञाधारकाप्रमाणे काम करतात. मात्र या श्वानांचे मालक ‘माल्टीज’च्या नाजूक शरीरयष्टीमुळे कोणत्याही प्रकारचे काम देण्यासाठी तयार नसतात.
केस सावरण्याची गरज
या श्वानांच्या शरीरावर खूप जास्त प्रमाणात लांब केस असल्याने दररोज या कुत्र्यांचे ग्रुमिंग करावे लागते. केसावर सतत ब्रश फिरवावा लागतो. केसांमध्ये गुंता होऊ न देणे, प्रत्येक केस वेगळा असणे याची सतत काळजी मालकास घ्यावी लागते. या कुत्र्यांचे केस खूप जास्त प्रमाणात गळतात. त्यामुळे घरातील व्यक्तींना केसांपासून त्रास असल्यास अशा व्यक्तींनी ‘माल्टीज’ कुत्र्यांचे पालन करू नये. भारतात बेंगलोर, दिल्ली, चेन्नई या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात ‘माल्टीज’ कुत्र्यांचे ब्रीडिंग केले जाते. मुंबईमध्ये काही लोकांकडे हे कुत्रे आहेत. मात्र या कुत्र्यांच्या जास्त किमतीमुळे आणि घ्याव्या लागणाऱ्या काळजीमुळे भारतात कमी प्रमाणात या कुत्र्यांचे पालन होते. वेगवेगळ्या डॉग शोजमध्ये ‘माल्टीज’ कुत्रे पहिल्या आठ क्रमांकांमध्ये पाहायला मिळतात. १९०२ मध्ये इंग्लंडमध्ये ‘माल्टीज’ कुत्रे पहिल्यांदा डॉग शोजमध्ये प्रदर्शनास आणले गेले. तेव्हापासून जगभरात हे ‘माल्टीज’ लोकप्रिय आहेत.