जर तुम्ही मेट्रोमोनियल किंवा शादी डॉट कॉम सारख्या लग्न जुळविणाऱ्या साईडवर लग्न ठरविण्याचा विचार करत असाल तर सावधान! कारण ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या परिसरात एका महिलेची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. महिलेला ऑनलाईन लग्न ठरवण्याचे आमिष दाखवून एका नायजेरियन इसमाने तब्बल साडे तीन लाख रुपये उकळले. महिलेची फसवणूक करणाऱ्या नायजेरियन आरोपीला ठाणे पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. अर्नेस्ट उसनोबुन असे या आरोपीच नाव असून त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा नायजेरियन असणारा अर्नेस्ट उसनोबुन हा गेल्या ३ वर्षापासून भारतात राहत होता. केवळ शादी डॉट कॉमवर लग्नासाठी आपला परिचय टाकणाऱ्या महिलांशी तो फेसबुक किंवा व्हॉटसअॅपच्या माध्यमातून संपर्क साधायचा. याच माध्यमातून त्याने  ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेबरोबर संपर्क साधला. त्याने या महिलेला लग्न ठरवून देण्याचे आमिष दाखवले. महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवत  त्याने मागणी केलेली रक्कम त्याच्या खात्यात जमा केली. पण आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिने सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर ठाणे पोलिसांनी दिल्ली येथून या आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून ३ पासपोर्ट, एक लॅपटॉप, चार मोबाईल फोन आणि मोडेम देखील हस्तगत केला.