मालमत्तेच्या वादातून हल्ल्याचा संशय

भिवंडी महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर असतानाच मंगळवारी रात्री महापालिकेतील सभागृह नेते मनोज म्हात्रे यांची निर्घृणपणे हत्या झाली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून बुधवारी मनोज यांच्या कालवार या मूळ गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या हत्येच्या निषेधार्थ भिवंडीतील कालवार, पारनाका, बाजारपेठ आणि अंजुरफाटा परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. तसेच दिवसभर शहरात तणावाचे वातावरण होते.

दरम्यान, या हत्येप्रकरणी नारपोली पोलिसांनी सात संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये मनोज यांचे चुलत बंधू प्रशांत म्हात्रे यांचादेखील समावेश आहे. राजकीय वैमनस्य किंवा मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र आरोपींच्या अटकेनंतरच नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे कामे आटोपून ते घरी परतले. इमारतीखाली कार पार्क करून ते घरी जात होते. त्या वेळेस हल्लेखोरांनी पाठीमागून येऊन त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्यावर कोयत्याने वार केले. हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. जखमी अवस्थेत मनोज यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भिवंडीत बुधवारी तणावाचे वातावरण होते.

मनोज यांचे पार्थिव बुधवारी त्यांच्या कालवार या मूळ गावी नेण्यात आले. या गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिर्घकाळ नगरसेवक

भिवंडी येथील ओसवालवाडीत मनोज म्हात्रे राहत होते. भिवंडी तालुक्यातील कालवार हे त्यांचे मूळ गाव आहे. ते गेली २५ वर्षे भिवंडी महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते पालिकेत सभागृह नेते म्हणून कार्यरत होते. यापूर्वी ते दोनदा स्थायी समितीचे सभापती होते. भिवंडीतील काँग्रेस पक्षाच्या मातब्बर नेत्यांमध्ये ते गणले जात होते. त्यांनी पक्षाच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची धुरा तीनदा सांभाळली तर त्यांच्याकडे १४ वर्षे तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी होती.