दोन वर्षे उलटूनदेखील पर्यटकांसाठी सुविधांची वानवा; येऊरला पर्यटन केंद्राचा दर्जा नसल्याने कार्यक्रमांना बंदी
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असलेले आणि घोडबंदर मार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मानपाडा परिसराला पर्यटन विभाग जाहीर करुनही ठाणेकर पर्यटकांना वन पर्यटनाच्या सुविधांपासून मात्र वंचित रहावे लागत असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वी वन मंत्रालयाने मानपाडा परिसराचा पर्यटन विभागांच्या यादीत समावेश केला. मात्र, आजतागायत या भागात कोणत्याही पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. विशेष म्हणजे, प्राण्यांच्या अधिवासाला धोका पोहचू नये यासाठी येऊर जंगलांना पर्यटनापासून जाणीवपूर्वक दूर ठेवणाऱ्या प्रशासनाने येथील बंगले, हॉटेल, दारुच्या भट्टयांना अभय दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन विभागामार्फत जंगलातील जैवविविधता दाखवण्यासाठी ‘अ नाइट अंडर द स्टार्स’ अशा स्वरुपाचे दोन दिवसीय निसर्ग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. निसर्गतज्ञांच्या मार्गदर्शनातून या जंगलांमध्ये सूक्ष्मजीवांचे छायाचित्रण, जंगलातील छायाचित्रांचे स्लाईड शो, रात्रीच्या वेळी टेलिस्कोपच्या माध्यमातून चांदण्याचे परीक्षण अशा काही उपक्रमांचा समावेश या कार्यक्रमात करण्यात आला आहे. मात्र, असेच कार्यक्रम येऊरच्या जंगलात घेण्यास वनविभागाने मनाई केली आहे. प्राण्यांच्या अधिवासाला धोका पोहोचेल, असे कारण वनप्रशासनाने दिले आहे. दुसरीकडे, घोडबंदर मार्गापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मानपाडा हे ठिकाण पर्यटन क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. मुंबईच्या धर्तीवर ठाणेकरांसाठी याठिकाणी जैवविविधतेची माहिती देणारे कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. मात्र, वन विभागाकडून त्यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याचे निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे. एकीकडे प्राण्यांच्या अधिवासाचे कारण पुढे करत येऊरला पर्यटनापासून लांब ठेवले जात आहे तर दुसरीकडे, मानपाडा आणि येऊर भागातील खासगी बंगले आणि हॉटेलांतील मेजवान्या आणि पाटर्य़ाना मात्र वनविभागाने अभय दिले आहे.
दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहाय्यक वनसंरक्षक उदय ढगे यांनीदेखील शासनाने येऊर हे पर्यटन क्षेत्र घोषित करण्याचा निर्णय घेतल्यास येऊरमध्ये निसर्ग कार्यक्रम होऊ शकतात, असे म्हटले आहे. ‘येऊरचे जंगल जैवविवीधतेच्या अंगाने पोषक आहे. दर दहा वर्षांनी शासनाचे निर्णयात फेरफार होते,’ असेही ते म्हणाले.
येऊरच्या जंगलात निसर्ग कार्यक्रम आयोजित केले गेल्यास येथील खासगी अतिक्रमणावर अंकुश बसण्यास मदतच होईल, असे येऊर एव्हायर्नमेंटल सोसायटीचे रोहीत जोशी यांनी म्हटले आहे. पर्यटन क्षेत्र नसल्याने असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी वनविभागाकडून परवानगी दिली जात नाही. वनविभाग आणि पर्यावरण संस्था यांनी एकत्रित रित्या अशा कार्यक्रमांसाठी प्रयत्न केल्यास ठाणेकरांना निसर्ग तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे निसर्गाचा माहितीपूर्ण आनंद घेता येऊ शकते, असे ते म्हणाले.

येऊरमधील जीवसृष्टी
* येऊरच्या जंगलात उन्हामुळे दिवसा सूक्ष्मजीव आढळत नाहीत. रात्री मात्र हे जंगल जैवविवीधतेने फुलून जाते.
* पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत येऊरचे जंगल सूक्ष्मजीवांच्या छायाचित्रणासाठी अतिशय पोषक आहे.
* याच दरम्यान ओरिएन्टल द्वार्क किंगफिशर हा पक्षी श्रीलंकेमधून येऊरमध्ये वास्तव्यासाठी येतो.