ठाणे, कल्याण, डोंबिवलीत झेंडे आणि घोषणा

मुंबईत बुधवारी दुपारी निघालेल्या विराट मराठा मोर्चाची नांदी ठाणे, कल्याण, डोंबिवलीत सकाळी झाली. या भागांतील मोर्चेकऱ्यांनी पहाटेपासूनच मुंबईची वाट धरली. त्यामुळे महत्त्वाच्या रस्त्यांवर, चौकांत आणि रेल्वे स्थानकांत पहाटेच भगवे झेंडे फडकू लागले. ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणेने ठाणे दणाणले. मुंबईच्या या वेशीवर शिवसेना नेत्यांनी  मोर्चेकऱ्यांसाठी न्याहारीची व्यवस्था केली आणि त्यानिमित्ताने राजकीय शक्तिप्रदर्शनातून लक्ष वेधण्यात आले.

राज्यभरातून आलेले मोर्चेकरी ठाणे शहरात दाखल झाले आणि मुंबई-नाशिक महामार्गाने मुंबईकडे रवाना झाले, त्यामुळे सकाळचे काही तास महामार्ग आणि रेल्वे स्थानकांचे परिसर भगव्या झेंडय़ांनी गजबजले. रेल्वे स्थानक परिसर, मुंबई-नाशिक महामार्ग, शहरातील महत्त्वाचे चौक या ठिकाणी मोर्चासाठी जाणाऱ्या नागरिकांचे समूह जमले होते. शहराच्या अंतर्गत भागात राहणाऱ्यांना ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचणे सोपे व्हावे, म्हणून शिवसेनेने खासगी बसची व्यवस्था केली होती.

लोकमान्यनगर, वर्तकनगर, सावरकरनगर या भागांतील मोर्चेकऱ्यांनी या खासगी बसने रेल्वे स्थानक गाठले. ‘एक मराठा लाख मराठा’ ही घोषणा लिहिलेले टीशर्ट, टोप्या परिधान करून आणि हाती भगवे झेंडे घेऊन ठाण्यातील मोर्चेकऱ्यांचा ताफा मुंबईकडे निघाला होता. शहराच्या अंतर्गत भागात काळे टीशर्ट परिधान केलेले स्वयंसेवक सकाळपासूनच मोर्चेकऱ्यांना गोळा करताना दिसले.

मुंबई-नाशिक महामार्गावर तसेच शहरातील महत्त्वाच्या चौकांत राज्यभरातून येणाऱ्या मोर्चेकऱ्यांच्या स्वागतासाठी फलक लावण्यात आले होते, या मोर्चात आधीच्या मोर्चाच्या तुलनेत मुली आणि महिलांचे प्रमाण फारच कमी होते. खासगी बसला तसेच रिक्षांना लावण्यात आलेले भगवे झेंडे, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा देणारे नागरिक यामुळे ठाण्यातच मुंबईतील मोर्चाच्या भव्यतेची झलक दिसली. काटेकोर नियोजनामुळे मोर्चेकरी शांततेत आणि शिस्तबद्धपणे मुंबईकडे रवाना झाले. पहाटेपासूनच रेल्वे स्थानक परिसर आणि महामार्गावर झालेली मोर्चेकऱ्यांची गर्दी सकाळी अकरानंतर मात्र ओसरली.