मुंबईतील मराठा मोर्चाचे निमित्त साधत ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली यांसारख्या शहरात शिवसेनेने शखाशाखांतून बांधणी करत पक्षाचे मराठा समाजातील वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला. मोर्चासाठी निघालेल्या मराठा समाजातील नागरिकांसाठी शाखाशाखांमधून पुरविण्यात आलेली वाहन व्यवस्था, मुंबईच्या वेशीवर मोर्चेकऱ्यासाठी करण्यात आलेली पोटपूजेची सोय, वातावरण निर्मितीसाठी जागोजागी उभारण्यात आलेले होर्डिग्ज आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीला उतरविण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या फौजेमुळे मोर्चाच्या आयोजनात शिवसेनेची छाप अगदी स्पष्टपणे दिसून आली.

वर्षभरापूर्वी ठाणे शहरातून निघालेल्या मराठा मोर्चाच्या आयोजनात शिवसेना नेत्यांनी स्वत:ला झोकून दिले असले तरी अधिकाधिक मदत पडद्यामागून होईल या विषयी विशेष काळजी घेण्यात आली होती. या वेळी मात्र पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी अगदी उघडपणे या आयोजनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतल्याचे चित्र होते. गेल्या आठवडाभरापासून ठाणे, नवी मुंबईत शिवसेना नेत्यांच्या पुढाकाराने न्याहरी तसेच वाहनतळाच्या कामे केली जात होती. मोर्चासाठी वातावण निर्मिती व्हावी यासाठी फलक उभारणीतही शिवसेना नेत्यांची मोठा हातभार लावल्याचे स्पष्ट होत आहे. बुधवारी दिवसभर पक्षाच्या शाखांमधून मोर्चासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी मदत केंद्र सुरू करण्यात आले होते. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वागळे इस्टेट, वर्तकनगर, घोडबंदर परिसरातून मोर्चासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी वाहनव्यवस्था पुरविण्यात आली होती. मोर्चेकऱ्यांना रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्यासाठी खास बसेस तैनात करण्यात आल्या होत्या. याशिवाय अधिकाधिक शिवसैनिक मोर्चात सहभागी होतील अशापद्धतीने तयारी करण्यात आली होती.

मोर्चा नव्हे दसरा मेळावाच

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी ठाणे शहरातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक रवाना होत असत. मेळाव्याच्या तोंडावर ज्या पद्धतीने शाखाशाखांमधून तयारी केली जात असे तीच पद्धत मराठा मोर्चाच्या तयारीसाठी अवलंबण्यात आली होती, अशी माहिती पक्षाच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिली. आपापल्या भागातून किती रहिवासी मोर्चासाठी सहभागी होणार आहेत याची इत्थंभूत माहिती गेल्या काही दिवसांपासून शाखांमधून घेतली जात होती. ठाणे तसेच आसपासच्या भागातील मराठाबहुल वस्त्यांमधून शिवसैनिकांना सक्रिय करण्यात आले होते. ठाण्यातील लोकमान्यनगर, सावरकरनगर, वागळे इस्टेट भागातील मराठाबहुल वस्त्यांमधील रहिवाशांची नोंदणी करून त्यांना स्थानकापर्यंत सोडण्यासाठी ७० हून अधिक बसेस तैनात ठेवण्यात आल्या होत्या, असेही या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.