विजय तेंडुलकर लिखित ‘कमला’ या गाजलेल्या नाटकावर आधारित त्याच नावाची मालिका दूरचित्रवाहिनीवर सध्या गाजत आहे. त्यातील ‘कमला’ साकारणारी अभिनेत्री अश्विनी कासार हिची छोटय़ा पडद्यावरची ही पहिलीच भूमिका. मात्र, बदलापूरच्या आदर्श विद्यामंदिर शाळेत शिकत असल्यापासून अश्विनीने रंगमंचाशी नाते जोडले. रुईया महाविद्यालयात असताना ‘गमभन’ एकांकिका स्पर्धेसह अनेक एकांकिका, नाटकांतून ती रसिकांसमोर आली. याशिवाय कार्यक्रमांचे लेखन-निवेदन करतानाही तिने वाहवा मिळवली. हे सर्व करत असताना अर्थशास्त्र व सांख्यिकी विषयाची पदवी, एलएलबी आणि मास्टर ऑफ लॉ अशा उच्च शिक्षणाच्या पायऱ्याही तिने ओलांडल्या आहेत. अशा या हुशार अभिनेत्रीसोबतच्या गप्पा..

* आवडते मराठी चित्रपट :  ‘अशी ही बनवाबनवी’, ‘श्वास’, ‘देवराई’, ‘कोर्ट’, ‘उंबरठा’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’.
* आवडती नाटकं- ‘मोरूची मावशी’, ‘नांदी’, ‘समुद्र’, ‘काटकोन त्रिकोण’, ‘फायनल ड्राफ्ट’.
* आवडलेले टीव्ही कार्यक्रम- ‘वादळवाट’, ‘प्रपंच’, ‘देख भाई देख’, डान्स रिअ‍ॅलिटी शो, ‘बडे अच्छे लगते है’.
* आवडते दिग्दर्शक- मंगेश कदम, अनुराग कश्यप, गुलजार, चैतन्य ताम्हाणे, उमेश कुलकर्णी.
* आवडते सहकलाकार- स्पृहा जोशी, दीप्ती केतकर, अक्षर कोठारी.
* आवडतं गाणं- ‘मेरा कुछ सामान’, आशा भोसले यांनी गायलेली सगळी भावगीतं.
* आवडते लेखक- गुलजार, पावलो कोहलो, इस्मत चुगताई, शिवाजी सावंत.
* आवडते कवी- गुलजार, कुसुमाग्रज, हरिवंशराय बच्चन, इंदिरा संत.
* आवडते अभिनेते- नसिरुद्दिन शहा, आमिर खान, अतुल कुलकर्णी, सुबोध भावे.
* आवडती अभिनेत्री- स्मिता पाटील, रेखा, माधुरी दीक्षित, दीपिका पदुकोण, स्पृहा जोशी.
* आवडता फूड जॉइंट्स- बदलापुरातील डोंबिवली नागरी सहकारी बँकेसमोरील पाणीपुरी स्टॉल.
* आवडतं हॉटेल- फोर्ट परिसरातील उच्च न्यायालयाजवळचे ‘कॅफे मिलिटरी’.
* आवडती पुस्तकं- शांता शेळके लिखित ‘चौघीजणी’, इंग्रजीतील ‘दा विंची कोड’, ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’, हिंदीतील ‘रावीपार’.
* आवडलेल्या कविता- ‘पृथ्वीचे प्रेमगीत’, ‘मांजर’, इंदिरा संत यांच्या सगळ्या कविता, अरुणा ढेरे लिखित ‘राधे पुरुष असाही असतो’, अमृता प्रीतम यांच्या कविता.
* निवेदन क्षेत्रातील कामगिरीविषयी : अभिनय, नृत्य शिकत शिकत करीत असतानाच अनेक जाहीर कार्यक्रम, सभागृहातील कार्यक्रम, राजकीय तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन करण्याची खूप हौस होती आणि आहे. दोन स्कीट्स, दोन गाणी याच्यामधील जागा आपल्या लेखन-निवेदनाने भरून काढतानाही उपस्थित रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची हातोटी, प्रसंगावधान, स्थल-अशा गोष्टी करण्यातला आनंद निवेदन क्षेत्रात मिळतो. त्या अनुषंगाने संदर्भ शोधण्यासाठी करावे लागणारे वाचन, लेखन याची आवड मुळात असल्यामुळे निवेदनाची आवड जोपासली.
*  बदलापूरची आठवण : माझा जन्म कुळगांव-बदलापूरचा आहे. आमचं एकत्र कुटुंब खूप आधीपासूनच बदलापुरात स्थायिक आहे. आजोबा मुरलीधर कासार अहिराणी भाषेत नाटक लिहायचे. घरातील सर्वजण बदलापूरकर प्रेक्षकांसमोर ते सादर करायचे. बदलापुरात राहणारे लोक हे लवचीक स्वभावाचे आहेत. माझे नृत्यगुरू स्वप्निल धोत्रे मला बदलापुरातच भेटले. आदर्श विद्यामंदिरमध्ये भेटलेले शिक्षक, प्रायोगिकतेचे त्यांनी केलेले संस्कार हे मिळाले. बदलापुरात नाटय़गृह नाही परंतु इथल्या ओपन थिएटरवर अनेक चांगले, उत्तुंग कलावंत येऊन नाटकाचे प्रयोग सादर करून गेले आहेत. दूर असूनही बदलापूरकर रसिकांच्या प्रतिसादासाठी कलावंत येथे येतात. माझ्यासाठीही दूर असूनही जवळचं असं माझं बदलापूर आहे. असे मला वाटते.
शब्दांकन-संकलन : सुनील नांदगावकर