वसईतील मराठी पुस्तकाचे एकमेव दुकान सुरू करण्याबाबत पुस्तकप्रेमींकडून विनवण्या

वसई-विरार शहरातील ‘केळकर-अभ्यंक आणि मंडळी’ हे मराठी पुस्तकांचे एकमेव दुकान बंद झाल्याने पुस्तकप्रेमी आणि साहित्यिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. हे दुकान सुरू राहावे यासाठी दुकानमालकांना मराठी वाचकांकडून विनवण्या करण्यात येत आहे.

मराठी पुस्तकांना वाचक नसल्याने ‘केळकर-अभ्यंकर आणि मंडळी’ हे दुकान ३० जुलैपासून बंद करण्याचा निर्णय या दुकानाचे मालक अनिल अभ्यंकर यांनी घेतला. कमी झालेले मराठी वाचक, इंग्रजीकडे वाढता कल यांमुळे हे दुकान नाइलाजाने बंद करावे लागत असल्याचे मालकांनी सांगितले. डहाणूपासून बोरिवलीपर्यंत मराठी साहित्य मिळणारे हे एकमेव दुकान असल्याने सफाळे, पालघर, दहिसर, भाईंदर येथून वाचक येथे पुस्तक घेण्यासाठी येतात. लोकसत्ता वसई-विरारने बुधवारी याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर साहित्यिक, वाचक, प्रकाशक यांनी याबाबत हळहळ व्यक्त केली.

वसईतील मराठी साहित्य मिळणारे हे एकमेव दुकान होते. त्यामुळे ज्यांना दुकानात जाऊन पुस्तक चाळून बघायची सवय असते, त्यांची अडचण निर्माण झाली आहे. ऑनलाइन पुस्तके मागवता येतात, परंतु त्यामध्ये आपण ते पुस्तक चाळून पाहू शकत नसल्याने मराठी वाचकांचे नुकसानच झाले आहे.

वीणा गवाणकर, साहित्यिका

मराठी साहित्याला सध्या वाईट दिवस आले आहे. आम्ही प्रकाशकही मंदीमध्ये आहोत. पूर्वी वर्षभरात ३४ ते ३५ पुस्तकांचे प्रकाशन व्हायचे. गेल्या वर्षभरात ही संख्या १२ ते १५ पर्यंत येऊन ठेपली आहे. वसईतील मराठी पुस्तकांचे एकमेव माध्यम बंद होत असल्याने अतिशय दु:ख होत आहे.

अशोक मुळय़े, डिंपल पब्लिकेशन

सुसंवादाचे हक्काच ठिकाण म्हणजे अभ्यंकरांचे पुस्तकालय. पुस्तकांच्या गर्दीत रेंगाळत कित्येक पिढय़ा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करणारे हे हक्काचे एकमेव ठिकाण. आता दुर्मिळ किंवा लागणारी पुस्तके कोणाकडून मागवायची हा प्रश्न डोकावू लागला. मराठी वाचक वर्ग कमी झाल्याच कारण अभ्यंकरांनी दिले, ते बहुतांशी बरोबरच आहे. ज्येष्ठ नागरिकांव्यतिरिक्त कोणी फिरकत नाही ही खूपच खेदाची बाब आहे.

पल्लवी बनसोडे, कवयित्री

वसईतील मराठी साहित्याची पंढरी असलेले हे दुकान बंद होणे ही दुर्दैवाची

गोष्ट आहे. अभ्यंकरांनी

वसईत साहित्य चळवळ उभी केली, परंतु आता ती बंद होणार असल्याने अतिशय दु:ख होत आहे.

फा. फ्रान्सिस कोरिया, ज्येष्ठ साहित्यिक

हा पालकवर्गाचा खूप मोठा पराभव आहे. आपल्या मुलांनी वाचनाचा छंछ जोपासावा, त्यांना वाचनाची आवड लागावी याकडे लक्ष देणे ही पालकांची जबाबदारी आहे. इंग्रजी माध्यम हे एक कारण असेलच, पण हातातील मोबाइल जोवर दूर होत नाही, तोवर पुस्तक नावाचा मित्र कसा जोडता येईल.

विजय सातघरे, चित्रपट दिग्दर्शक

दर शनिवारी न चुकता अभ्यंकर यांच्या दुकानातून नवीन पुस्तक विकत घ्यायचो. आता पुस्तके विकत घेण्यासाठी मुंबईला जावे लागणार आहे.

शेखर धुरी, कोकण मराठी साहित्य परिषद