हॉलीवूडमधील ‘कंगफू पांडा’ मालिकेतील अॅनिमेटेड चित्रपट न पाहिलेल्यांची संख्या नगण्य असेल. धडाधड संवादफेक आणि तडातड हाणामारी करणारी ‘पांडा’ची व्यक्तिरेखा आबालवृद्धांना भुरळ पाडते. पण हाच कंगफू पांडा ‘आपला हात भारी, आपली लाथ भारी, च्यामायला आपलं सगळंच लय भारी’ असं म्हणू लागला तर..? गंमत वाटेल न! हॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपटांतील अजरामर व्यक्तिरेखांच्या तोंडी मराठी किंवा हिंदी चित्रपटातील संवादांची जुळणी करत बनवण्यात आलेल्या चित्रफितींनी सध्या इंटरनेटवर अक्षरश: तुफान उठवले आहे. काही निवडक प्रसंगांचे गमतीशीर संवादांनी डबिंग करून पुण्यातील एका तरुणाने तयार केलेल्या या चित्रफिती जगभरात लोकप्रिय ठरत आहेत.
पुण्यात राहणारा प्रतीक मेहता आणि अकलूजच्या पराग गायकवाड यांनी संकलन (एडिटिंग) सचेतपट (अॅनिमेशन) क्षेत्राचे शिक्षण घेऊन त्यांच्या अभिषेक आनंद, दीपराज जाधव, तुषार धुर्वे या तीन मित्रांच्या साथीने ‘इनविझिओ स्टुडिओ’ कंपनीची मुहूर्तमेढ रोवली आणि याच नावाचे फेसबुक पेज तयार केले. सुरुवातीला या पेजवरून सामाजिक संदेश आणि दैनंदिन घटनांवरील चित्रकृती पोस्ट करण्यात येत होत्या. मात्र, काहीतरी वेगळं करण्याच्या विचारातून या चमूला डबिंगची कल्पना सुचली आणि त्यातूनच आठवडय़ाच्या दर शुक्रवारी नवनवीन चित्रकृती फेसबुकवर सादर केली गेली.
हॉलीवूडच्या प्रसिद्ध ‘थ्री हन्ड्रेड’ या युद्धपटातील व्यक्तिरेखांच्या तोंडी बॉलीवूडमध्ये गाजलेल्या
‘जोधा अकबर’ या ऐतिहासिक चित्रपटाचे संवाद देऊन इनविझिओ स्टुडिओच्या तंत्रज्ञांनी त्यांच्या कामाला तीन आठवडय़ांपूर्वी सुरुवात केली. काही दिवसांतच नेटकऱ्यांना या चित्रफितीने वेड लावले. व्हॉट्सअॅपसारख्या सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून या चित्रफितीला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांचा उत्साह दुणावला आणि मराठमोळ्या ‘कंगफू पांडा’चा यातून जन्म झाला. या चित्रपटातील ‘पांडा’ प्राण्याच्या व्यक्तिरेखेच्या तोंडी मराठीतील ‘लय भारी’ सिनेमाचे, ‘‘आपला हात भारी, आपली लाथ भारी, च्यामायला सगळंच लय भारी’’ असे संवाद देऊन तयार केलेल्या एक मिनिटाच्या चित्रफितीला जगभरातून प्रतिसाद मिळाला. संयुक्त अमिराती (यूएई)च्या जॉश ९७.८ या रेडिओ वाहिनीच्या फेसबुक पेजवर या चित्रफितीला तासाभरात हजारो ‘लाइक्स’ मिळाले. ‘लय भारी’ चित्रपटाचा अभिनेता रितेश देशमुख याने ही चित्रफीत स्वत:च्या अधिकृत फेसबुक पेजवरून शेअर केली. हॉलीवूडच्या बॅटमॅन चित्रपटातील ‘जोकर’ व्यक्तिरेखेच्या तोंडी ‘अग्निपथ’ चित्रपटातील अभिनेते अमिताभ बच्चन यांचे संवाद दिले.