विद्यार्थ्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल अधिकाधिक गोडी निर्माण व्हावी यासाठी विविध महाविद्यालयात यंदाही मराठी भाषा दिन साजरा करण्याचे आदेश शासनाच्या मराठी भाषा व सांस्कृतिक विभागाने दिले आहेत. फेब्रुवारी महिना म्हणजे महाविद्यालयाचा शेवटचा महिना असतो. त्याच महिन्यात विद्यार्थ्यांच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा, वरिष्ठ महाविद्यालयाच्या फेरपरिक्षा तसेच बारावीच्या परीक्षा असतात. पुन्हा याच महिन्यात निवडणुका आल्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक त्या कामांमध्ये व्यस्त होते. मात्र तरीही शासकीय परिपत्रकानुसार महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा दिन साजरा केला जाणार आहे.

मराठी भाषा आणि सांस्कृतिक विभागाने आठवडाभरापूर्वी काढलेल्या नवीन निर्णयाप्रमाणे ग्रंथदिंडी किंवा बाहेरील सभागृहात कार्यक्रम केले नाही तरी चालतील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे काही नामांकित आणि जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या महाविद्यालयांनी अकरावी, वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध विद्यार्थी मंडळ यांच्या हातात संयुक्तरित्या  संपूर्ण कारभार सोपवत कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. मराठी दिनाच्या आयोजनाबाबत ठाण्यातील जोशी- बेडेकर महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक संतोष राणे म्हणाले, मराठी भाषा दिन हा आपल्या भाषेचा एक गौरव दिवस असतो. तो धुमधडाक्यात साजरा झालाच पाहिजे. निवडणूका आणि परीक्षा आल्या असल्या तरी ११ वी आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्रित करुन हा दिवस शासनाच्या सूचनेप्रमाणे साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ठाण्यामधील के.बी.पी महाविद्यालयांच्या प्राचार्याशी संपर्क साधला असता त्यांनी निवडणुकीच्या कार्यक्रमात शिक्षक वर्ग व्यस्त असल्याने आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने आम्ही मराठी दिनानिमित्त महाविद्यालयाबाहेरील कार्यक्रमांपेक्षा महाविद्यालयातील कार्यक्रमाला पसंती दिली आहे, असे सांगितले. मराठी भाषा शुध्द बोलण्यास प्रारंभ केल्यास उत्तमरित्या हा दिवस साजरा करु शकतो, असे पेंढरकर महाविद्यालयाच्या वरद धोत्रे या विद्यार्थ्यांने सांगितले.

(जतीन तावडे, सौरव आंबवणे)

सीएचएम महाविद्यालयात कुसुमाग्रज, मराठी भाषा, गडकिल्ले विषयक कार्यक्रम

* मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषा, कुसुमाग्रज, गड किल्ले संवर्धन आणि शिवजयंती या विषयांवर लक्ष केंद्रित करून उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयात कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. यावेळी शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणारा पोवाडा सादरीकरण करण्यात येईल.

* पुण्यातील शिवदुर्ग संवर्धन या संस्थेच्या मदतीने विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ९२ गडकिल्लय़ांची छायाचित्रे जमवली आहेत.  छायाचित्रे दाखवून गड किल्ले संवर्धनाचे महत्व पटवून देणारे एक सादरीकरण विद्यार्थी करणार आहेत. गड किल्लय़ांचे रक्षण करण्यासाठी वर्षांतून किमान तीन वेळा विविध किल्लय़ांना भेट देऊन संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेतली जाणार आहे.

*  यानंतर कुसुमाग्रजांचे आयुष्य अभिवाचनातून उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच त्यांच्या निवडक कवितांचे अभिवाचन करणार आहेत. पाच मिनिटे शुध्द मराठीत बोलण्याचा प्रयत्न विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून करणार आहेत.

वझे केळकर महाविद्यालय ग्रंथदिंडी आणि विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, काव्यवाचन 

केबीपी महाविद्यालय ठाणे</strong>

‘आठवणीतल्या कविता या ज्ञानेश्वर ते गुरू ठाकूर’ यांनी लिहिलेल्या कविता एका हस्तलिखितात संग्रहीत करून त्याचे प्रकाशन आणि वाचन जोशी बेडेकर महाविद्यालय ग्रंथदिंडी, काव्यवाचन, काव्यरसग्रहण आणि निबंध स्पर्धा शासनाने मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्याच्या सूचना महाविद्यालयांना दिल्या असल्या तरी सक्ती करण्यात आलेली नाही. मराठी भाषा जोपासण्यासाठी विद्यार्थी, प्राध्यापकांनी त्यांच्या स्तरावर कार्यक्रम आयोजित करावेत.

– विनोद तावडे, शिक्षणमंत्री

सैनिकांचा सन्मान करुन शिवजयंती साजरी

गोवेली येथील जीवनदीप महाविद्यलयातील राष्ट्रीय सेवा विभागातर्फे संरक्षण क्षेत्रातील सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबाचा सन्मान करुन शिवजयंती साजरी करण्यात आली. देशाच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या शूरवीर अशा वीस आजी-माजी सैनिकांचा सन्मान महाविद्यालयात करण्यात आला. सैनिकांना प्रदान करण्यात आलेले सन्मान चिन्ह व पत्र हे विद्यार्थ्यांनी आपल्या पॉकेटमनीमधून तयार केले होते. याप्रसंगी उपस्थित संजय तांबे , विजय पवार, सौरभ सिंह आणि सतीश आवस्ती या सैनिकांनी विद्यार्थ्यांना सीमेवरील आपले अनुभव सांगितले. तसेच तरुणांनी देशसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले. शिवजयंतीनिमित्त ढोल ताश्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.महाविद्यालयाच्या प्रा.भाग्यश्री पवार आणि गीतांजली गीध यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती देणाऱ्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.    (प्रशांत घोडविंदे)

जिल्हास्तरीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात विद्यार्थ्यांचे श्रमसंस्कार

मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जीवनदीप महाविद्यालय गोवेली यांच्या संयुक्त विद्यमाने टिटवाळा जवळील म्हस्कळ गावात ‘स्वच्छ भारत अभियान’ विषयावर आधारित जिल्हास्तरीय श्रमसंस्कार शिबीर नुकताच पार पडले. या सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी ग्रामस्वच्छता, हागणदारी मुक्त गाव, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामसर्वेक्षण, आरोग्य शिबीर आणि बंधारे बांधणे असे अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले. या शिबिरामध्ये ठाणे जिल्’ाातील ३८ महाविद्यालयातील शंभरहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. याप्रसंगी स्वयंसेवकांसाठी वृक्ष लागवड व संवर्धन, पक्षी ओळख, ग्रीन लिव्हींग कन्सन्टन्सी, घनकचरा व्यवस्थापन, सोलर कुकींग आणि देवराई वनीकरण या विषयांवर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्या होत्या.

स्वयंसेवकांना योगाचे महत्त्व कळावे आणि त्यांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी शिबिरातील प्रत्येक दिवसाची सुरूवात योगसाधना आणि व्यायामाने होत होती. शिबिरास उपस्थित पाहुण्यांचे स्वागत स्वयंसेवकांनी रद्दीच्या पेपरपासून बनवलेले फमेल्डर्स, जुन्या कपडय़ांपासून बनवलेल्या पिशव्या आणि तुळशीचे रोप देऊन केले. यातून टाकाऊपासून टिकाऊ असा संदेश देण्यात आला. मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा विभाग समन्वयक बी.एस.बिडवे यांनी शिबिरास भेट देऊन स्वयंसेवकांच्या कार्याचे व शिस्तीचे कौतुक केले.      (प्रशांत घोडविंदे)