नवीन इमारतीसाठी घेतलेले कर्ज संस्थाचालक फेडू शकले नसल्याने अंबरनाथ येथील शिशू विकास संस्थेच्या गोखले रहाळकर शाळेची चक्क लिलावाद्वारे विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या तब्बल ७५० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अंबरनाथमधील सर्वात जुनी शाळा असा लौकिक असणाऱ्या खेर विभागातील गोखले रहाळकर शाळेची इमारत धोकादायक असल्याने संस्थाचालकांनी नवीन इमारत बांधण्यासाठी ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सच्या उल्हासनगर शाखेतून २००० मध्ये सात लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र कर्जाचे हप्ते न फेडल्यामुळे बँकेने नियमानुसार शाळेच्या इमारतीचा लिलाव केला. उल्हासनगर येथील नरेश टुनिया यांनी ही इमारत विकत घेतली. २०१२ मध्ये ऐन दिवाळीत सहामाही परीक्षेच्या काळात शाळेला सील ठोकण्यात आले. मनसेचे नगरसेवक स्वप्निल बागुल यांनी उच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात जनहित याचिका दाखल केली. त्यामुळे न्यायालयाने या लिलाव प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देऊन विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले. मात्र गेल्या महिन्यात २६ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने ही जनहित याचिका फेटाळून लावल्याने या शाळेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कारण नरेश टुनिया यांनी आता इमारत ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी या संदर्भात शिक्षण उपसंचालकांना पत्र लिहून शाळेने नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये असे कळविले आहे.

शाळा सुरू ठेवण्याचा प्रश्नच नाही

‘आम्ही ही इमारत लिलावामध्ये खरेदी केली होती. संस्थाचालकांना इमारत रिकामी करण्यास पुरेसा वेळ दिला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ही यामागची भूमिका होती. मात्र आता शाळा सुरू ठेवण्याचा प्रश्नच नाही,’ अशी प्रतिक्रिया नरेश टुनिया यांनी दिली आहे.

बंद पडू देणार नाही
कोणत्याही परिस्थितीत अशा पद्धतीने एक मराठी शाळा कुणीही बंद करू शकत नाही. त्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करू, असा इशारा आमदार रामनाथ मोते यांनी दिला आहे.

‘वर्गणी काढून कर्ज फेडले’
गोखले रहाळकर शाळेत कनिष्ठ मध्यमवर्गीय गटातील ७५० मुले शिकतात. २३ शिक्षक शाळेत आहेत. २०१२ मध्ये शाळेला सील ठोकल्यानंतर शिक्षकांनी वर्गणी काढून २५ लाख रुपये कर्ज फेडले. शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी आठ लाख रुपये दिले. अशा रीतीने ३३ लाख रुपये फेडले आहेत. तरीही शाळा ताब्यात घेण्याचा कुणी प्रयत्न करणार असेल तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा मुख्याध्यापिका वंदना तांदुळे यांनी दिला आहे.