पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षणसंस्थांकडून शिक्षकांवर जबाबदारी; विद्यार्थी वाढवण्यासाठी वेगवेगळय़ा सवलती

विद्यार्थी-पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमातील शिक्षणाकडे दिवसेंदिवस वाढत चालल्याने मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. त्यामुळे मराठी माध्यमाच्या खासगी शाळांच्या संस्थाचालकांची झोप उडाली आहे. अनेक शिक्षण संस्थांना मराठी माध्यमाचे वर्ग सुरू ठेवण्याच्या निकषावर मान्यता व अनुदान मिळत असल्याने मराठीची पटसंख्या वाढवण्यासाठी या शाळांनी आता विद्यार्थी शोधण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली आहे. परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा वाढलेला कल, विशिष्ट शाळांमध्ये प्रवेशासाठी सुरू झालेली स्पर्धा यामुळे मराठी वर्गासाठी विद्यार्थी शोधताना शिक्षकांचीही अक्षरश: दमछाक होत आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांत मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे. पटसंख्या कमी झाल्यामुळे कल्याण, डोंबिवलीतील काही शाळा याआधीच बंद पडल्या आहेत. तर आपलीही पटसंख्या कमी झाल्यास मान्यता व अनुदान रद्द होईल, अशी धास्ती उरलेल्या शाळांच्या संस्थाचालकांना वाटू लागली आहे. त्यामुळेच शहरातील दाट वस्तीची ठिकाणे, झोपडपट्टय़ा, नवीन वसाहती याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालण्याचे आर्जव करण्याची जबाबदारी शाळांनी शिक्षकांवर सोपवली आहे. काही शिक्षण संस्थांनी एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यापासून शिक्षकांना वेगवेगळे प्रभाग वाटून दिले आहेत. त्या प्रभागात फिरून विद्यार्थ्यांची नावे, पालकांची नावे आदी माहिती गोळा करून आणायची आणि पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करायचा, अशी जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. पटसंख्येअभावी शाळा बंद पडली तर नोकरीवरही गंडांतर येईल म्हणून शिक्षकही सुटीवर पाणी सोडत विद्यार्थी शोधत हिंडत आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेशशुल्क, गणवेश, पुस्तके याबाबत सवलतीही देऊ केल्या जात असल्याचे समजते.
शहरातील गरीब, गरजू वस्त्यांमधील शेकडो विद्यार्थी मराठी माध्यमांसाठी निवडले जाऊ लागले आहेत, अशी माहिती डोंबिवलीतील एका प्रथितयश मराठी शाळेच्या मुख्याध्यापकाने ‘ठाणे लोकसत्ता’शी बोलताना दिली. ज्यांना शाळेत मुलांना घालणेच शक्य नाही अशा पालकांपर्यंत शिक्षक, मुख्याध्यापक पोचले आहेत. मराठी माध्यमाकडे विद्यार्थ्यांनी वळावे म्हणून काही शाळांनी अनेक नवनवीन उपक्रम, तसेच शालेय अभ्यासक्रमातही बदल केले आहेत. ई लर्निग, टॅबची सुविधा, खेळांना प्रोत्साहन, यासोबतच शहराजवळील पाडय़ांमधील मुलांना आणण्यासाठी बसेसची सुविधा तसेच पाडय़ावरच मुलांसाठी तात्पुरती शाळा सुरू करणे असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत.

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
Haryana school bus accident,
VIDEO : शाळेच्या बसला भीषण अपघात; पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

मराठी माध्यमातील मुलांची पटसंख्या खालावत चालली आहे. पटसंख्या नसल्यास शाळांना मान्यता मिळत नाही. अनेक ठिकाणी मुलांचा सर्व खर्च शिक्षक आणि विश्वस्त उचलत आहेत. हल्ली पालकांना इंग्रजी येवो अगर न येवो, पाल्याला मात्र इंग्रजी माध्यमामध्ये घालण्याकडेच त्यांचा कल असतो. त्यासाठी हवा तेवढा पैसा ओतण्यास ते तयार असतात. त्यामुळे मराठी विद्यार्थ्यांसाठी ही शोध मोहीम आखावीच लागते.
– सुरेश महाजन, डोंबिवलीतील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ

टिळकनगर शाळेला मुलांची उणीव फारशी भासली नसली तरी मराठी वर्गाचा टक्का घसरत आहे. सेमी इंग्रजीचा पर्याय उपलब्ध असल्याने काही पालक मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. यावर्षी आम्ही गुरुकुल हा नवीन उपक्रम सुरू करत आहोत. मात्र हा विद्यार्थी शोध मोहिमेचा भाग नाही.
– निळकंठ शेंबेकर, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ

शर्मिला वाळुंज,