पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई यांच्या ‘मी कोण?’ पुस्तकाचे प्रकाशन
समाजाच्या आत्मनिर्भरतेसाठी तो आर्थिक सामथ्र्यवान असणे आवश्यक आहे. त्यासाठी अर्थसामर्थ्यांची साधना मराठी तरुण आणि उद्योजकांनी केली पाहिजे. बऱ्याचदा आपण आपल्या स्वतला कमी लेखतो, त्यामुळे आपल्या क्षमतादेखील आपण कमी वापरतो. हे बंधन झुगारून दिल्यामुळेच पितांबरीचा विस्तार आज भारतभर झाला असून चार लाख दुकानांतून दीड कोटीहून अधिक ग्राहकांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. मराठी तरुणांनी आपल्या आवडीचे रूपांतर उद्योगात केले तर हे सहज शक्य होईल, असे प्रतिपादन रवींद्र प्रभुदेसाई यांनी व्यक्त केले. पितांबरीचे व्यवस्थापक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या यशोगाथा असलेले ‘मी कोण?’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले, त्या वेळी त्यांनी हे विचार मांडले.
पितांबरीने गेल्या २५ वर्षांत १२५ कोटींचा पल्ला घाटल्याचे औचित्य साधून पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडणाऱ्या ‘मी कोण?’ या पुस्तकात श्वेता गानू यांनी शब्दबद्ध केले आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यालयाचे कुलपती डॉ. गो. बं. देगलुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास सॅटर्डे क्लब, ग्लोबल ट्रस्ट या मराठी उद्योजकांच्या संस्थेचे संस्थापक व उद्योजक माधवराव भिडे उपस्थित होते. तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक शंतनू भडकमकर, सुयश प्रकाशनच्या संस्थापिका श्वेता गानू, सोहळ्याचे स्वागताध्यक्ष अजय जोशी आणि पितांबरीचे अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. ‘मी कोण?’ हे पुस्तक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या कौटुंबिक शैक्षणिक, उद्योजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक वाटचालीचा मागोवा आहे. त्यात त्यांच्या श्रमाचे, स्वप्नांचे तसेच नावीन्यपूर्ण उद्योजकीय संकल्पनांचे व यशाचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न यात केला असल्याचे श्वेता गानू यांनी सांगितले.
तर अडचणी आणि समस्यांकडे वेगळ्या, त्रयस्थ भूमिकेतून बघितले तर त्यातच संधी ही लपलेली असते. आपण बऱ्याच वेळा समस्या कुठे आणि कशी आहे याचा विचार करीत बसतो. पण असे न करता अन्य ठिकाणी समस्या का नाही? हे जर शोधले तर समस्येवर मात करणे सहज शक्य होते. मराठी तरुण हुशार आहेत, पण उद्योजक होऊन कष्ट करण्यापेक्षा उच्चशिक्षण घेऊन चांगल्या कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर नोकरी मिळवणे हेच त्यांचे ध्येय असते, ही मानसिकता सोडली पाहिजे, असा सल्ला वेलिंगकर इन्स्टिटय़ूटचे अधिष्ठाता डॉ. श्रीनिवास गोंधळेकर यांनी दिला.

झोप उडवणारी स्वप्ने पहा!
डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी आपल्या मनोगतात, झोपेत स्वप्न पाहण्यापेक्षा झोप उडवणारी स्वप्ने पाहायला शिकले पाहिजे. तरच पितांबरीसारखी संस्था उभी राहते. कष्टासोबत नवनवीन संकल्पना व सतत संशोधनाचा ध्यास घेऊन रवींद्र प्रभुदेसाई यांनी हा ब्रॅण्ड तयार केला आहे. उद्योगाबरोबर अनेक संस्थांनाही समर्थ साथ दिली आहे. त्यामुळे रवींद्र प्रभुदेसाई हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहे, असे मत माधवराव भिडे यांनी व्यक्त केले. या वेळी कलाताई प्रभुदेसाई आणि निर्मला प्रभुदेसाई उपस्थित होत्या.