२१ किमीच्या स्पर्धेतील शर्यतपटूंना सेवा रस्त्यांवरील खड्डय़ांचा त्रास

ठाणे महापौर मॅरेथॉनच्या रस्त्यावरील खड्डय़ांचा त्रास यंदा काहीसा कमी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असताना २१ किमीच्या स्पर्धकांना माजिवडा परिसरातील सेवा रस्त्यांवरील खड्डय़ांचा फटका सहन करावा लागला. या मार्गावरील खड्डय़ांची अवस्था लक्षात घेऊन महापालिकेने खेळाडूंना महामार्गावरून धावण्याची मुभा दिली होती, मात्र महामार्गावरील वाहनांची वर्दळ स्पर्धकांना अडथळा ठरत होती. महापौर मॅरेथॉनसाठी पहिल्यांदाच कळवा परिसरातून सुरू करण्यात आलेल्या नव्या मार्गावरील खड्डय़ांचाही खेळाडूंना काहीसा त्रास सहन करावा लागला. महापालिका प्रशासनाने मात्र खेळाडूंना कोणताही त्रास झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ठाण्यात यंदाच्या वर्षी पडलेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती. मात्र यंदा युद्धपातळीवर काम करून खड्डे बुजवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा अवलंब करण्यात आला होता. जेट पॅचर यंत्रणेच्या साहाय्याने रस्त्यावर पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्यात येत आहेत. महापौर मॅरेथॉनच्या रस्त्यावरील बरेचसे खड्डे बुजवण्यात आले होते. मॅरेथॉनपूर्वी सर्व खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. रविवारी सकाळी सुरू झालेल्या स्पर्धेच्या दरम्यान काही ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांचा त्रास स्पर्धकांना सहन करावा लागला. त्यामध्ये २१ किमीची स्पर्धा धावणाऱ्या स्पर्धकांना माजिवडा ते मानपाडादरम्यान सेवा रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांचा त्रास सहन करावा लागला. या खेळाडूंना ऐन वेळी सेवा रस्त्यांऐवजी महामार्गावरून धावण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र महामार्गावरून धावताना वाहनांचा अडथळा या खेळाडूंना पार करावा लागत होता. तर कळवा येथून सोडण्यात आलेल्या १० किमीच्या स्पर्धकांना शहरातील काही भागांतील खड्डय़ांचा त्रास सहन करावा लागला. खड्डे बुजवलेल्या ठिकाणीही तयार झालेल्या अडथळ्यांमुळे खेळाडू पडण्याच्या घटना घडत होत्या. मात्र पूर्वीपेक्षा परिस्थिती अधिक चांगली असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.