महिलेच्या तीन लहानग्यांसमोरच कृत्य; अ‍ॅसिड हल्ल्याचाही दावा, आरोपी फरार

कळवा येथील घोलाईनगर परिसरात रहाणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेच्या घरात शिरलेल्या सहा जणांपैकी दोघांनी बलात्कार केल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. बलात्कारादरम्यान आरोपींनी अ‍ॅसिड हल्ला केल्याने छातीला जखम झाल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे.  पिडीत महिलेच्या तीन मुलांदेखतच हा सर्व प्रकार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कळवा येथील घोलाईनगर परिसरात पिडीत महिला आपल्या कुटूंबासह रहाते. तिला १२ वर्षांची एक मुलगी, नऊ वर्षांचा आणि नऊ महिन्यांचा असे दोन मुलगे आहेत. चार दिवसांपूर्वी तिचा पती काही कामानिमित्त गावी गेला आहे. याच संधीचा फायदा घेऊन रविवारी सायंकाळी सहा आरोपी तिच्या घरात शिरले. त्यापैकी दोघांनी मुलांचे तोंड दाबले तर दोघांनी पिडीत महिलेचे हातपाय पकडले आणि उर्वरित दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी तेथून पलायन केले. या घटनेनंतर पिडीत महिला कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच कळवा पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन तिचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले आहे.

[jwplayer dy7r2d6R]

बलात्कारादरम्यान आरोपींनी अ‍ॅसिड हल्ला केल्याने छातीला जखम झाल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे. या घटनेसंदर्भात कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.एम.बागवान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. याप्रकरणातील आरोपी पिडीत महिलेच्या ओळखीचे असून पुर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याची बाब प्राथमिक तपासात पुढे येत आहे. तसेच पिडीत महिलेच्या छातीवर असलेली जखम अ‍ॅसिडची नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. असे असले तरी वैद्यकीय तपासणीनंतरच ही बाब स्पष्ट होऊ शकले. या घटनेप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.