ठाणे स्टेशनला कोणत्याही मार्गाने आलात तरी पहिले दर्शन घडते ते तलावांचे. रेवाळे, मासुंदा, गोशाला, आंबे, घोसाळे, ब्रह्माळे, मखमली, कचराळी हे तलाव कॅसल मिल ते ठाणे रेल्वे स्टेशन या मध्य रेल्वेच्या सभोवार शुद्ध व सुखद हवेचा झोत सोडीत ठाण्यातील वाढत्या प्रदूषणाला नियंत्रणात ठेवण्याचे काम चोखपणे करताना दिसतात. या शहराला ठाणे नाव ठेवताना कुठे तरी गफलत झालेली दिसते आहे. एके काळी साठ तलाव व तितकीच मंदिरे या तलावांभोवती होती. आजघडीला ३५ तलाव ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत. त्यामुळे तलावांचे शहर किंवा तळेगाव म्हणून ठाण्याचे नाव शोभून दिसले असते; पण नावात काय आहे, असे ठणकावून पूर्वसुरींनी ठाणे नाव ठेवले ते बहुधा आपले ऐतिहासिक ठाणे पुढे राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत भव्यदिव्य प्रगती करील हे भाकीत त्यांनी जाणले असावे, म्हणून आज ठाणेकर ‘ठाणे तेथे काय उणे’ असे अभिमानाने बोलू लागले आहेत. यात तलावांची कमी नाही हे ओघाने आलेच. ठाण्यातील या सर्व तलावांचा शिरोमणी आहे मासुंदा तलाव. ठाण्याचे हृदय समजल्या जाणाऱ्या मासुंदा तलावाभोवती समस्त ठाणेकरांचे भावविश्व गुंफले गेले आहे.
मासुंदा या तलावाचे मूळ नाव आहे ‘मासवदा’. अपभ्रंशाने त्याचे मासुंदा झाले. आठशे वर्षांपूर्वी चंपावती (चेऊल)च्या भोजराजाने ठाण्यावर स्वारी केली. तो कळव्याला येत असतानाच महिबिंबाने ८००० सैनिकांसह त्याला गाठले. महाभयंकर युद्ध झाले. त्यात भोजराजा मारला गेला. नंतर भोजराजाचा प्रधान महिबिंबावर चालून आला. त्याचा शेषवंशी केशवराव याने वध केला, तर भोजराजाच्या पालकपुत्राला मरोलच्या हंबीररावाने यमसदनास पाठविले. त्यामुळे भोजराजाचे उरलेसुरले सैन्य भयभीत होऊन पळून गेले. हा विजय महिबिंबाने ठाण्यातील ‘मासवदा’ (मासुंदा) तलावाकाठी मोठय़ा थाटामाटात साजरा केला. महिकावतीच्या बखरीत हा प्रसंग तिथी, वारासहित लिहिला आहे.
।। संवत १२४५।।
।। मग राजा ‘मासवदा’ तळ्यावर आला।।
।। तेथे देसायाला वृत्ती दिधल्या।।
।। तेधवा शेषवंशी केशवराव नावाजिला।।
।। पदक गळ्याचे दिधले आणि पद चोधरी पावला।। (चौधरी पदास)
संवत वर्ष इ.स.पेक्षा ५७ वर्षे जास्त असल्यामुळे ही घटना इ.स. ११८८ सालात घडली आहे, म्हणजेच हा तलाव शिलाहार काळात बांधला असून त्याचे नाव ‘मासवदा’ आहे. त्याभोवती असलेला राजप्रासाद व मंदिरांमुळे येथे सांस्कृतिक व्यासपीठ तयार झाले, जे आजही ठाणेकरांनी जिवापाड जपले आहे. मासवदा ऊर्फ मासुंदा तलावाशिवाय याला महादेवाचा तलाव, शंकर तलाव, कौपिनेश्वर तलाव, शिवाजी तलाव, तलावपाळी किंवा ठाण्याची चौपाटी म्हणतात.
मासुंदा तलावाच्या कट्टय़ावर प्रेमिकांच्या गुजगोष्टींपासून जाहीर सभा-संमेलनापर्यंत, स्फुट काव्य-कथांपासून कादंबरी, नाटकापर्यंत आणि रिकामपणच्या वेळात कट्टय़ावरील गप्पांपासून मौलिक गंभीर चर्चासत्रापर्यंत होणाऱ्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचा मूक साक्षीदार असलेल्या मासुंदा तलावाला ठाणेकरांनी आपल्या हृदयात अनन्यसाधारण अशी महत्त्वाची जागा दिली आहे. अनेक कवी, लेखक, नाटककार, पत्रकार, कलाकार यांच्या प्रतिभेला मासुंदाच्या कट्टय़ावर धुमारे फुटले. काहींनी आपल्या पुस्तकांचे व मासिकांचे प्रकाशन चांदणे शिंपित जाणाऱ्या चंद्राच्या साक्षीने मासुंदा तलावात नावेत बसून केले आहे.
जिवंत झरे असलेल्या मासुंदा तलावाच्या तीन बाजूंना छोटय़ा टेकडय़ा व पूर्वेला कौपिनेश्वर मंदिर समूह असून पूर्वी या तलावाचे पाणी मंदिरांना स्पर्श करीत असे. इ.स. १८६३ साली नगरपालिकेची स्थापना झाल्यावर ठाणे नगरपालिकेच्या पहिल्या स्थायी समितीच्या सभांचे ३० मार्च १८६३ ते २४ एप्रिल १८६४ चे इतिवृत्त मोडी लिपीतून लिहिले आहे. त्यात ९ सप्टेंबर १८६३ च्या नोंदीत ‘महादेवाच्या देवळाजवळ तलाव आहे, त्यातील कचरा काढण्याचे ?????कंत्राक्ट ३४ रुपयांस दिले, त्याजबद्दल जगजीवन जव्हेरदासकडून रक्कम आली आहे. करिता ?????कंत्राक्टर यास ३४ रुपये द्यावे’.. यावरून नगरपालिकेने सुरुवातीपासूनच महादेव तलाव ऊर्फ मासुंदा तलावाकडे लक्ष द्यावयास सुरुवात केली होती. त्याला नागरिकांच्या सहभागाची आणि श्रमदानाची जोड मिळाली. यानंतर तीनदा तलाव साफ करण्यात आला. १९५६-५९ व १९९२ साली ठाणेकरांनी श्रमदानाने तलाव साफ केला आहे. विशेषत: १९५६-५९ साली मासुंदा तलावातील हायसिंचसारख्या चिवट वनस्पती-वेलींचा गुंतावळा तोडून, पाणी उपसून तलाव रिकामा करण्यात आला व त्याची पश्चिमेकडील बाजू खोल खणून तिथली माती पूर्वेकडे टाकण्यात येऊन जवळजवळ १/३ तलाव बुजविण्यात आला आणि त्यावर नवीन ठाणे स्टेशन रस्ता करण्यात आला. याकामी ठाण्यातील घरटी एक तरी माणूस श्रमदानात उतरला होता. सार्वजनिक हितासाठी नागरिकांनी एकत्र येण्याची ही भव्य परंपरा फक्त ठाण्यातच पाहावयास मिळते. ६ फेब्रुवारी १९५९ रोजी या नवीन पर्यायी मार्गाचे उद्घाटन डिव्हिजन कमिशनर भार्गवराव बंबावाले आय.सी.एस. यांच्या हस्ते झाले व शिवाजी पथ असे नामकरण झाले. त्यानंतर २२ जून १९६४ रोजी मासुंदा तलावात बसविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा. दौलतराव तथा बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते झाले. या पुतळ्याचे शिल्पकार होते आर. टी. शिवगावकर.
यानंतर मासुंदा तलावाच्या सुशोभीकरण कार्यास वेग आला. तलावाच्या ईशान्य कोपऱ्यात लॉरी तळ होता, तो नगरपालिकेने हलविला. तलावाभोवती पक्के रस्ते करून कठडे बांधले. १९७४ साली रेमंड वूलन मिलच्या चालकांकडून तलावाच्या मधोमध साडेसतरा फूट त्रिज्येचे कमल पुष्पाकृती विविधरंगी कारंजे बांधण्यात आले. आता तेथे बलभीमाची
भव्य मूर्ती उभी आहे आणि तलावाच्या चारी कोपऱ्यांत थुईथुई उडणारी रंगीबेरंगी कारंजी रात्री तलावाची शोभा वाढवीत आहेत. त्यात १९७८ साली तलावाच्या पश्चिम किनाऱ्यावर राम गणेश गडकरी रंगायतन बांधल्यामुळे मासुंदा तलावाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आणि ती पडतच राहणार आहे.
 सदाशिव टेटविलकर